नितिन पंडीत
भिवंडी ( दि. १३ ) भिवंडीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या झपाट्याने वाढली असून शहरात असलेल्या कोविड रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांना इतरत्र हालाविण्याची वेळ खासगी कोविड रुग्णालयावर आली आहे. विशेष म्हणजे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच रुग्णालयातील ऑक्सिजनसाठा संपल्याने रुग्णालय प्रशासनांसह रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
भिवंडी महापालिकेच्या वतीने शहरात खुदाबक्ष हॉल हे एकमेव कोविड सेंटर सध्या सुरू आहे. तर शहरात सुमारे १३ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या खासगी रुग्णालयांपैकी धामणकर नाका येथील ऑरेंज हॉस्पिटल या खासगी कोविड रुग्णलयामधील ऑक्सिजन साठा मंगळवारी संपल्याने या रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. रुग्णालयाला ऑक्सिजन साठा पुरविणाऱ्या कंपनीकडून रुग्णालयाला ऑक्सिजन साठा मिळाला नसल्याने रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन साठा उपलब्ध नसल्याने रुगणालायत उपचार घेणाऱ्या रुग्णांना इतरत्र हालाविण्याची सूचना देखील रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच नवीन रुग्णांना या रुग्णालयात सध्या ऑक्सिजन अभावी प्रवेश देखील देता येत नसल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे. तर रुग्णालयात अचानक ऑक्सिजन साठा संपल्याने व रुग्णांना इतरत्र हालाविण्याची सूचना हॉस्पिटल प्रशासनाने केल्याने काही काळ नातेवाईकांची ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे. ऑरेंज हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या ६० बेड आहेत पैकी २१ बेड सध्या भरलेले आहेत. मात्र या २१ रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा संपल्याने नातेवाईकांची एकच धावपळ उडाली होती.
आमचा रुग्ण मनपाच्या खुदाबक्ष हॉल येथे ऍडमिट होता मात्र दोन दिवसांपूर्वीच आमचा रुग्ण ऑरेंज हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला आहे मात्र आज ऑक्सिजन नसल्याने आम्हाला रुग्णाला दुसरीकडे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी आमची धावाधाव सुरु आहे अशी प्रतिक्रिया ऑरेंज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. तर भिवंडी शहरात ऑक्सीजन साठा कमी आहे सध्या महानगरपालिकेकडे सुद्धा कमी आहे. सध्या सुमारे १४ हजार लिटर ऑक्सीजन मनपा कडे शिल्लक आहे. ज्यादा साठा मिळावा यासाठी शासनाच्या एफ.डी.ए औषध पुरवठा शाखेकडे मागणी केली आहे अशी प्रतिक्रिया मनपाचे उपायुक्त दीपक झिंगाड यांनी दिली आहे. ऑरेंज हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनचा साठा कमी आहे या रुग्णालयाची आपण स्वतः पाहणी केली असून तेथे तात्पुरत्या स्वरूपाची मदत दिली असून एफडीएने तातडीने ऑक्सिजन पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे मात्र सध्या कोणत्याही रुग्णास या रुग्णालयातून हलविले नाही अशी माहिती भिवंडी मनपाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे.