ठाणे : जनकवी पी. सावळाराम यांची गाणी लहानपणापासून ऐकत होतो. सावळाराम यांच्या सुगम संगीताचा मधुघट आजही अजरामर आहे. नव्या पिढीला काही चांगले ऐकावेसे वाटल्यास त्यांना सावळाराम यांच्या गाण्यांकडेच वळावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे यांनी येथे केले.ठाणे महापालिका व जनकवी पी. सावळाराम कला समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने रविवारी पार्श्वगायक रवींद्र साठे यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, पालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के, उपायुक्त संदीप माळवी, कल्पना पाठारे, उदय पाटील, संजय सावळाराम आदी मान्यवर उपस्थित होते.अलका कुबल-आठल्ये यांना गंगा-जमुना पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्काराला येताना गंगा-जमुना साडी मुद्दाम परिधान करून आले आहे. पी. सावळाराम यांच्या नावाने मला पुरस्कार दिला, हा माझा सन्मान आहे. चित्रपटांतून केलेल्या भूमिका या अनेकांना रडवणाºया ठरल्या असल्या, तरी प्रत्यक्ष जीवनात मी खंबीर आणि कणखर आहे. प्रदीप ढवळ यांचे शैक्षणिक कार्य विनामूल्य असेल, तर त्यांनी हाक द्यावी, मी नक्कीच मदत करेन, असे आठल्ये यांनी यावेळी आश्वस्त केले.बिल्डरचा व्यवसाय सोडून शिक्षण क्षेत्रात जाणीवपूर्वक आलो. त्यामुळे सिमेंटच्या जंगलापासून बचावलो. पैशांपेक्षा माणसाला किती किंमत असते, हे दादा सावळाराम यांच्याकडून शिकलो, असे प्रा. ढवळ म्हणाले. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पुरस्कार कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. नरेश म्हस्के यांनी सांगितले की, पी. सावळाराम दादा हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. त्यांनी येऊर येथे राबवलेली पाणीयोजना, ठाण्यातील ड्रेनेजयोजना अनेकांना ठाऊक नसेल. ठाणे शहर व ज्ञानसाधना विद्यालयाच्या उभारणीत दादांचा सिंहाचा वाटा होता, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय पाटील यांनी केले.माझ्या यशात माझे पती, सासू, सासरे, मित्रमंडळी, दिग्दर्शकांपासून तंत्रज्ञापर्यंत सगळ्यांचा वाटा असल्याचे अभिनेत्री अलका कुबल- आठल्ये यावेळी म्हणाल्या. सुरुवातीला एकदोन चित्रपटांच्या यशामुळे माझ्या डोक्यात हवा गेली होती. मात्र, काही चित्रपट पडल्यावर मी जमिनीवर आले. अनेक भूमिका केल्यावर लक्षात आले की, यश हे एकट्याचे नसते, असे त्या म्हणाल्या.पुरस्कार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ पार्श्वगायक साठे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी साठे यांनी सामना या प्रसिद्ध चित्रपटातील आरती प्रभू यांचे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, हे गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने सांगितले की, मी ठाणेकर आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. ठाण्यातून माझ्या कलेला खरा सपोर्ट मिळाला, हे त्यांनी आवर्जून सांगितले.साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल कवी व लेखक डॉ. महेश केळुसकर, शैक्षणिक क्षेत्रातील प्रा. प्रदीप ढवळ आणि लक्षवेधी कलाकार म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांना प्रत्येकी २१ हजार रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कवी व लेखक डॉ. केळुसकर यांनी पुरस्काराबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करत एक कविता सादर केली.
पी. सावळारामांचा ‘मधुघट’ अजरामर-रवींद्र साठे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 4:37 AM