मुरबाड : हातात आलेले भाताचे पीक खोडकिड्याने नष्ट केले. फक्त सडलेला पेंढा उरला आहे. केलेले कष्ट वाया गेल्याने भगवान भला व इतर शेतकऱ्यांनी पिकाची अवस्था पाहून पेंढ्याला काडी लावली. या घटनेला दोन वर्षे झाली, तरी भातपिकाची नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकºयांनी तहसील कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
२०१७ मध्ये मुरबाड तालुक्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करण्यात आले. सरकारने नुकसानभरपाईची रक्कम मंजूर केली, परंतु ती रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात टाळाटाळ सुरू आहे, अशी तक्रार मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान भला व शिरोशी विभाग सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक पठारे यांनी केली आहे.
नुकसानभरपाईची रक्कम कधी मिळणार, याबाबत शेतकरी चौकशीसाठी तहसील कार्यालयात गेले, तर त्यांना मुरबाड तालुका कृषी कार्यालयाने माहिती दिली नाही, असे सांगतात. कृषी कार्यालयात चौकशी केली असता मुरबाड पंचायत समितीकडून काहीही माहिती आली नाही, असे उत्तर देतात. पंचायत समिती कार्यालयात आमच्याकडून कोणतेही काम बाकी नाही. विभागाने सर्व काम पूर्ण केले आहे, असे अधिकारी सांगतात. मग, सरकारने मंजूर केलेली रक्कम शेतकºयांना का मिळत नाही, असा सवाल भला व पठारे यांनी विचारला आहे.
चार हजार शेतकºयांच्या बँक खात्यात ६३ लाख जमा करण्यासाठी कृषी विभागाने बँकेकडे याद्या पाठवल्या होत्या. परंतु, बँकेने याद्या संगणकावर एक्सेलशीटवर तयार करून पाठवा, असे सांगून परत पाठवल्या आहेत. त्याचे काम सुरू असून लवकरच रक्कम बँकेत जमा होईल. संयुक्त मालकी असलेल्या जमीनधारकांनी संमतीपत्र देणे आवश्यक असल्याने त्यांच्यासाठी दोन ते तीन दिवसांत कृषी विभाग, ग्रामसेवक व तलाठी यांची सभा बोलावणार आहे . - अमोल कदम, तहसीलदार