उल्हासनगर : महापालिकेने १५० धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी घोषित केल्या असून, त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या ३० इमारती खाली केल्या आहेत. त्यापैकी हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतीवर अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.
उल्हासनगरात दरवर्षी इमारती कोसळून मृत्यू झाल्याचे प्रकार झाले आहेत. भिवंडी येथील धोकादायक इमारत कोसळून ४०पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून, असंख्य जण जखमी झाले आहेत. भिवंडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका उपायुक्त मदन सोंडे यांनी कॅम्प नं -१ मधील हमलोग, कॅम्प नं-२ मधील शांती पॅलेस व कॅम्प नं-४ मधील ओम शिवगंगा या अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. तसे प्रसिद्धिपत्रक काढले आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने तिन्ही इमारतीवर आज पाडकाम कारवाई सुरू केली आहे. तसेच धोकादायक इमारतीच्या यादीत नसलेल्या अन्य इमारतीचे सर्वेक्षण करण्याचे संकेत उपायुक्त मदन सोंडे यांनी दिले.
शहरातील अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई पहापलिकेने सुरू केली. तर दुसरीकडे १३० धोकादायक इमारतीला पावसाळ्यात पूर्वी नोटिसा देऊन नागरिकांना इमारती खाली करण्यास सांगितले. मात्र इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेकडे आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे. पालिकेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने हजारो नागरिकांना धोकादायक इमारती राहावे लागत आहे. गेल्या वर्षी २० वर्ष जुन्या इमारतीचे ऑडिट करून घेण्याचा सल्ला पालिकेने इमारत धारकांना दिला होता. मात्र एकाही २० वर्ष जुन्या इमारती स्ट्रॅक्चर ऑडिट करून घेतले नाही.
धोकादायक इमारतींचा आकडा चुकीचाशहरात सन १९९० ते ९५दरम्यान रेती पुरवठा बंद असल्याने, त्यावेळी बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींमध्ये रेतीऐवजी दगडाचा चुरा व वाळवा रेती याचा वापर करीत होते. त्या काळातील बहुतांश इमारती धोकादायक होत असल्याने त्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.