ठाणे : नवेनवे ब्रॅण्ड्स येऊ लागल्याने यंदाच्या पाडव्याला श्रीखंडांची उलाढाल गतवर्षीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक श्रीखंडांनाच मागणी असल्याचे दुकानमालकांनी सांगितले. पाडव्यानिमित्त संपूर्ण ठाणे शहरात १५ ते १७ टन श्रीखंड फस्त होणार असल्याचा अंदाज दुकानमालकांनी वर्तवला. यंदा नव्याने आलेले लिची कोकोनट फ्लेव्हर्सचे श्रीखंड ठाणेकरांना चाखता येणार आहे.गुढीपाडवा आणि श्रीखंडाचे नाते अतूट असल्याने या दिवशी खवय्ये श्रीखंडावर चांगलाच ताव मारतात. मिठाईच्या दुकानांपासून उपाहारगृह, मॉल्स, किराणा स्टोअर्स, स्वीट्स शॉप यापासून अगदी डेअरीपर्यंत श्रीखंडांच्या खरेदीला उधाण येते. पाडव्याला श्रीखंडांची मागणी पाहता पारंपरिक श्रीखंडाप्रमाणे वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे श्रीखंड विक्रीसाठी उपलब्ध असते. श्रीखंड, आम्रखंड, केशरी श्रीखंड हे पारंपरिक श्रीखंड नेहमीप्रमाणे विक्रीसाठी असेल. परंतु, या पारंपरिक श्रीखंडांची खवय्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करणार असल्याने याचे प्रमाणही दुकानमालकांनी वाढवले आहे.श्रीखंड व केशरी श्रीखंड २८० रुपये, तर आम्रखंड ३०० रुपये याप्रमाणे दर आहेत. यंदा श्रीखंडाची उलाढाल अधिक होईल, त्यामुळे विक्री १७ टनांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे संजय पुराणिक यांनी सांगितले. पाडव्यानिमित्त श्रीखंडात केशरी वेलची, पंचामृत, स्ट्रॉबेरी, पाइनॅॅपल, डबल अंजीर, ड्रायफ्रूट्स हे फ्लेव्हर्स तर आहेत, परंतु नव्याने लिची कोकोनट या फ्लेव्हर्सचे श्रीखंड तयार करण्यात आले असल्याचे केदार जोशी यांनी सांगितले. जे घरी श्रीखंड तयार करतात, ते खवय्ये मलाई चक्का घेऊन जातात. त्यामुळे मलाई चक्कालाही मागणी कायम आहे. त्यातही त्यांच्यासाठी केशर वेलची हे फ्लेव्हर्स उपलब्ध असल्याचे जोशी म्हणाले. या फ्लेव्हर्सचे श्रीखंड ३२० आणि ३६० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. मलाई चक्का २८० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.रविवारी पाडवा असल्याने शनिवारी सकाळपासून श्रीखंडाच्या खरेदीला गर्दी होणार आहे. ही खरेदी पाडव्याच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत असेल, असे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले. या दिवशी मनसोक्तपणे श्रीखंड खाल्ले जाते. त्यामुळे कमीतकमी प्रत्येकाकडून अर्धा किलो श्रीखंडाची खरेदी होणार असल्याचे दुकानमालकांनी सांगितले.>इतर गोड पदार्थांनाही मागणीश्रीखंडाप्रमाणे पाडव्याला इतर गोड पदार्थांनाही मागणी असते. त्यात गुलाबजाम, जिलेबी, पुरणपोळीचीदेखील खरेदी होणार आहे. यानिमित्ताने गुजरातहून आमरसाचीदेखील आवक होते. त्यामुळे या आमरसालाही खवय्यांची पसंती असते. २४० रुपये किलोने ते उपलब्ध आहे, असे पुराणिक यांनी सांगितले.>प्युअर घी,जिलेबी, फाफडायंदा पाडव्याच्या निमित्ताने प्युअर घी, जिलेबी, फाफडा या पदार्थांचे लाइव्ह काउंटर असणार आहे. ग्राहकांना त्यांच्यासमोरच हे पदार्थ बनवून दिले जाणार असल्याचे जोशी म्हणाले.
पाडव्याला यंदा बाजारात लिची कोकोनट श्रीखंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 3:15 AM