कुमार बडदेमुंब्रा : ठाणे वाहतूक शाखेच्या मुंब्रा उपविभागातील पोलीस सध्या १२ फूट उंच टॉवरवरून वाहतुकीचे नियंत्रण करीत आहेत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे कल्याणाफाटा चौक कोंडीमुक्त झाल्याने या रस्त्यावरून वाहने हाकणारे वाहनचालक समाधान व्यक्त करत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४ वरील कल्याणफाटा चौकातून नवी मुंबई, पनवेल, डोंबिवली-कल्याण तसेच मुंब्रा या दिशेकडील वाहने मार्गस्थ होतात. यामुळे नेहमीच वाहनांनी गजबजलेल्या या चौकात अवघ्या काही दिवसांपूर्वी सातत्याने वाहतूककोंडी होत होती. यामुळे वाहनचालकांच्या वेळेचा तसेच इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत होता. यातून मार्ग काढून वाहनचालकांना दिलासा देण्याबाबत विचार विनिमय सुरू असतानाच चौकात वाहतूककोंडी नेमकी कशामुळे होते आणि रस्त्यावर किती दूरपर्यंत वाहनांची रांग लागली आहे.
हे कळल्यानंतर कोंडी फोडण्याबाबत उपाययोजना करणे सुलभ होईल, ही कल्पना मुंब्रा (उपविभाग) वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या निर्दशनास आली. ही बाब लक्षात येताच त्यांनी येथील चौकात वाहतूक नियंत्रणासाठी उंच टॉवर बांधण्याची योजना आखून प्रत्यक्षात ती अंमलात आणली.
आता या टॉवरवरून दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण केल्यानंतर दोन ते तीन किलोमीटर दरम्यान रस्त्यावर नेमकी किती वाहने धावत आहेत, याची कल्पना येते. त्यामुळे कुठल्या दिशेने येणारी वाहतूक थांबवायची आणि कुठल्या दिशेकडील वाहने प्रथम सोडायची याची अंमलबजावणी करणे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना सोपे जात आहे. यामुळे सध्या कल्याणफाटा चौक वाहतूककोंडीतून मुक्त झाला आहे.