लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील वयोवृद्ध नागरिकांची योग्य काळजी घेण्याचे काम ठाणे शहर पोलीस चोख करीत आहे. त्याची प्रचीती नुकत्याच एका घटनेवरून आली. ठाण्यातील७० वर्षीय आजीबाईं काेकणातील गावी गेल्या हाेत्या. तेथे त्या तोल जाऊन पडल्या. त्यांनी थेट कोपरी पोलीस ठाण्याचे संजीवन राणे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी राणे यांनी तेथील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून ठाणे येथे पाठवण्यास सांगितले. त्या आल्यावर ठाण्यात एका खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करून प्राण वाचले.
ठाणे पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकट्यादुकट्या राहणाऱ्या वयोवृद्धांची काळजी घेण्याबरोबरच त्यांना काय हवे नको, याची काळजी घेण्याच्या सूचना पाेलीस ठाण्यांना दिल्यात. त्यामुळे पोलिसांशी त्यांचे आपुलकीचे नाते तयार झाले आहे. याच आपुलकीतून राणे यांनी ही कामगिरी केली. प्रतिभा पालव (७०) या सिंधुदुर्गला गावी गेल्या होत्या. त्यांना पुन्हा ठाण्यात यायचे असल्याने त्या तिकीट काढण्यासाठी तिकीट बुकिंग केंद्रावर गेल्या होत्या. तेथून त्यांनी राणे यांच्याशी संपर्क साधून कोरोनाची स्थिती जाणून घेतली. याचदरम्यान त्यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्यात त्यांच्या मांडीचे हाड तुटले. त्यावेळी तेथील स्थानिक डॉक्टरांकडे गेले असता, रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. तसेच सहा महिने आरामही करावा लागेल, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी नातेवाइकांना संपर्क न साधता थेट राणे यांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. तेव्हा राणे यांनीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानंतर, राणे यांनी सिंधुदुर्ग येथील डॉक्टरांशी व त्यांच्या पुतण्याशी संपर्क साधून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे ठाण्यात आणण्यास सांगितले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर, त्यांच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. राणे यांनी केलेल्या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.