प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : संगणीकृत ग्रंथालयाच्या निमित्ताने ठाणे हे ग्रंथांचे गाव झाले आहे याचा मला अभिमान आहे. भिल्लारला जाऊन पुस्तक वाचणे हीच स्वप्नरंजक कल्पना असली तरी कृतिशील नावाचा प्रयोग या उपक्रमातून जाणवतो.
ज्ञानवैश्विकच्यादृष्टीने मराठी ग्रंथ संग्रहालयाने पुढचे पाऊल पुढे टाकले आहे पुस्तकाच्या आकाराप्रमाणे न राहता आकाशाएवढा उपक्रम झाला आहे. बुद्धीचा स्फोट होत असताना त्याला दिशा देणारे काम हे ग्रंथालय करते म्हणून या उपक्रमाचे स्वागत करत आहे. पुस्तकाच्या कागदी पानाला ई ग्रंथाचे पान जोडले जाणार आहे अशा भावना ज्येष्ठ कवी प्रा. प्रविण दवणे यांनी व्यक्त केल्या.
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेतर्फे रविवारी संगणकीकृत अभ्यासिकेचा उदघाटन सोहळा शारदा मंदिर, ग. ल. जोशी सभागृह येथे पार पडला. दवणे यांनी यावेळी त्यांचा वाचनालयातील पन्नास वर्षांपूर्वीच्या प्रवास उलगडला. महाविद्यालयाच्या सहली वाचनालयात आणल्यास अशा सहलींमुळे देखील सभासद संख्या वाढते याचे उदाहरण त्यांनी दिले. ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण म्हणाले की, ग्रंथालयाचा खरा अर्थ जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांना समजला आहे. ज्ञान देण्याचे काम ग्रंथालय करत असते.
मराठी ग्रंथ संग्रहालयात खगोलशास्त्राची कार्यशाळा घेण्याची इच्छा आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील म्हणाले की, चांगल्या कामाची नोंद होत असते. ठाणे जिल्ह्यात सर्वाधीक ग्रंथसंपदा असून ती विकसित आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयात आवश्यकता सुविधा आहेत आता वाचनालयांना भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. सुरूवातीला विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले संगणकृत वाचनालयाची माहिती प्राध्यापक संदीप भावसार यांनी दिली. सुत्रसंचालन वृं.दा. दाभोलकर यांनी केले.