डोंबिवली : येथील एमआयडीसी निवासी भागामधील रस्त्यांची खड्डयांनी अक्षरश: चाळण झाली असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेली डागडुजी नवरात्रौत्सवात जैसे थे झाले आहे. विशेष म्हणजे निवासी भागातील एम्स हॉस्पिटलच्या मार्गावर खड्ड्यांनी शंभरी गाठली असून, या दुरवस्थेकडे येथील महिला रहिवाशांनी प्रभाग अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी रस्ते दुरुस्तीवर केडीएमसी कोट्यवधी रुपये खर्ची घालते; परंतु आजच्या घडीला कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची या खड्डयांमुळे पुरती दैनावस्था झाली आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महत्वाच्या रस्त्यांची डागडुज्जी करण्याचा प्रयत्न झाला असलातरी अंतर्गत रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. एमआयडीसी निवासी भागातील सुदामानगर एम्स हॉस्पिटल मार्ग या छोटयाशा रस्त्यावर मोजून शंभर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर चालताना हे खड्डे त्रासदायक झाल्याचे येथील श्री सिद्धीविनायक अपार्टमेंटमधील विधीषा जठार, पल्लवी चव्हाण, गौरी केळकर या महिला रहिवाशांनी ई प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिधींचे लक्ष वेधले आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत असून तात्पुरत्या स्वरूपात केली जाणारी डागडुज्जी ही थातूमातूर ठरत आहे. सुदर्शननगर, मॉडेल कॉलेज परिसरातील रस्त्यांचीदेखील खड्डयांनी चाळण झाल्याचे चित्र आहे. यासंदर्भात ई प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रभाकर पवार यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
खड्ड्यांनी गाठली शंभरी!
By admin | Published: October 06, 2016 3:03 AM