भिवंडी- भिवंडीतील शिक्षा सुधार समितीच्या वतीने भिवंडी मनपा मुख्यालयासमोर आयोजित केलेल्या मेरी पाठशाला आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली आहे. या घोषणेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल होत पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावत १७ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे, ज्यात तीन महिला व चौदा पुरुष आंदोलकांचा समावेश आहे.
शहरातील विस्डम अकादमी इंग्लिश स्कूल या शाळेने विद्यार्थ्यांसह पालकांचे वर्तन चांगले नसल्याने शाळा प्रशासनाने सहा विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकत त्यांच्या नावे पोस्टाने शाळेतून काढल्याचे दाखले पाठवून दिल्याने पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.विशेष म्हणजे या मध्ये तीन विद्यार्थी हे शिक्षण हक्क अधिनियम द्वारे ऑनलाइन द्वारे प्रवेश घेतलेले होते.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रचंड अक्रोश पसरला होता.या विद्यार्थ्यांना न्याय मिळावे या हेतूने कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षा सुधार समितीच्या वतीने पालिका प्रशासन या बाबत कोणतीही कारवाई खाजगी शाळांवर करीत नसल्याने पालिका मुख्यालया समोर गुरुवार पासून मेरी पाठशाळा हे आंदोलन सुरु केले होते.हे आंदोलन ५ जानेवारी पर्यंत सुरू राहणार होते. रविवारी सुट्टी असल्याने बंद असलेले हे आंदोलन सोमवारी पुन्हा मनपा मुख्यालयासमोर करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी व पालकांसमोर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उठलेल्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याने आंदोलनात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. या घोषणांमुळे आंदोलन परिसरात एकच खळबळ उडाली होती.या घोषणानंतर आयोजकांनी व घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याने माफी मागितली, मात्र तोपर्यंत घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके पोलीस फौजफाट्यासह दाखल होत त्यांनी हे आंदोलन विनापरवाना व शासकीय नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे कारण पुढे करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात नेले. शहर पोलीस ठाण्यात आंदोलन कर्त्यांचे जबाब या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरु असून घोषणा देणाऱ्या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन त्याचा जबाब नोंदवून त्यास बाल न्यायालयासमोर हजर करू अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी दिली आहे.