पालघर : पालघरचे बिल्डर अजय दांडेकर हे आपल्या कुटुंबासह वाराणसी येथे देवदर्शनासाठी गेले असताना घरात कुणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील ३३९ तोळे सोने आणि रोख रक्कम असा सुमारे ८७ लाखांचा ऐवज चोरून नेला. त्यामुळे घराच्या बाहेर जाणाऱ्या कुटुंबाच्या पाळतीवर राहून चोऱ्या करणारी टोळी पालघरमध्ये सक्रिय असल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे.पालघरमधील प्रसिद्ध बिल्डर असलेले अजय दांडेकर हे आपली पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह दि. ५ जानेवारी रोजी वाराणसी येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यामुळे घरात कुणीच नसल्याची संधी साधून दोन चोरट्यांनी बंगल्यातील उघड्या खिडकीचे ग्रिल्स काढून घरात प्रवेश केला व कपाटातील ३३९ तोळे सोने व सात लाख रु. रोख रक्कम पळवून नेली. २० ते २५ वयोगटांतील या दोन अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात संरक्षणाची पुरेशी काळजी न घेतल्याची संधी साधून खिडकीला लावलेले लोखंडी ग्रिल्स उचकटून टाकत घरात प्रवेश केला. दांडेकर कुटुंबीय काल आपल्या बंगल्यात आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. ए. व्हजमाने इ.नी घटनास्थळी भेट दिली. आज दुपारी फिंगर प्रिंट तज्ज्ञांच्या टीमने काही संशयास्पद ठिकाणचे बोटांचे ठसे गोळा केले असून दांडेकर यांचे खाजगी रिव्हाल्व्हरही चोरून नेल्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु, पुन्हा त्यांनी आपला बेत बदलून रिव्हॉल्व्हर सोडून दिल्याने त्यावरही बोटांचे ठसे पोलिसांना मिळाले आहेत. घर, फलॅट, बंगले इ.मधून घराबाहेर पडणारी कुटुंबे हेरून घरफोड्या करणाऱ्या टोळ्या पालघरमध्ये सक्रिय असल्याची बाब आता पुढे येत असून चोरट्यांच्या या कार्यपद्धतीचा (मोडस आॅपरेंडी) शोध पोलिसांनी घेऊन चोरट्यांच्या टोळीचा बीमोड पालघर पोलिसांनी करायला हवा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून केली जात आहे. (प्रतिनिधी)
पालघरमध्ये ३३९ तोळे सोने चोरले
By admin | Published: January 19, 2016 2:02 AM