Shrinivas Vanga :पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे प्रचंड नाराज झाले होते. उद्धव ठाकरे या देवमाणसाची मला आज माफी मागायची आहे. एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळायला पाहीजे होता असं म्हणत श्रीनिवास वनगा घरातून निघून गेले होते. त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस यंत्रणा रात्रीपासून त्यांचा शोध घेत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वनगा कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला होता. अखेर दोन दिवसांनी श्रीनिवास वनगा हे घरी परतले आहेत. माझ्या बाबतीत चुकीची माहिती एकनाथ शिंदे यांना दिल्याने माझी उमेदवारी कापल्याचे श्रीनिवास वनगा यांनी म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा आणि त्यांचे कुटुंबीय मानसिक दृष्ट्या प्रचंड अस्वस्थ झाले आहे. श्रीनिवास वनगा हे कोणाला काहीही न सांगता अज्ञात वाहनातून घरातून निघून गेले होते. त्यानंतर दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यानंतर वनगा हे घरी परतले. यावेळी टीव्ही ९ मराठीशी बोलताना वनगा यांनी प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही असं म्हटलं आहे.
"मी कुठेही गेलो नव्हतो. मी माझ्या नातेवाईंकडे जवळपास होतो. दोन दिवस मी घराच्या आसपासच होतो. माझी सहज अपेक्षा होती की पालघर किंवा डहाणू विधानसभेमध्ये उमेदवारी मिळावी. त्यामुळे सहाजिकच नाराज होणारच आणि त्या भावनेतूनच जे काही बोलायचे ते बोललो. मी ठाकरे गटाच्या संपर्कात नव्हतो. फक्त रागाच्या भरात मी नातेवाईकांकडे निघून गेलो होतो," असं स्पष्टीकरण श्रीनिवास वनगा यांनी दिले.
"सध्या माझी कोणतीही भूमिका नाही. मी शंभूराज देसाईंसोबत बोललो आहे. फक्त एवढीच अपेक्षा होती की माझं तिकीट कापण्यासाठी ज्यांनी षडयंत्र त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारवाई करतील. एकनाथ शिंदे जे सांगतील ते काम मी करेल. हे बळी घेणारे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, राजेंद्र गावीत आहेत. त्यांच्यावर एकनाथ शिंदे कारवाई करतील याची मला खात्री आहे. प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही. त्यामुळे कदाचित मी पुढचा विचार मी करेन. माझ्या कुटुंबासाठी मला जगायचं आहे, असं श्रीनिवास वनगा म्हणाले.
"माझा घात एकनाथ शिंदे यांनी नाही तर त्यांना चुकीची माहिती देणाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांनी माझ्याबद्दल चुकीचा माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. आजपर्यंत आमचं घराणं महायुतीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही अजूनही कोणत्याही पक्षाचे काम करु शकत नाही. भाजप आणि शिवसेनेशिवाय मी कोणाचे काम करणार नाही," असं स्पष्टीकरण वनगा यांनी दिलं.
"आतातरी माझी उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा नाही. उद्धव ठाकरे हे खूप चांगले व्यक्ती आहेत हे मान्य करतो. पण सध्या मी त्यांच्याकडे जाण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय चुकला नव्हता. कारण अडीच वर्षांमध्ये काहीच काम होत नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी १२०० कोटींचा निधी मतदारसंघात आणला आहे," असंही श्रीनिवास वनगा यांनी म्हटलं.