ठाणेः पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का देण्यासाठी शिवसेनेनं चांगलाच जोर लावल्याचं चित्र आहे. पालघरमध्ये भाजपाचे नेते पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ दाखवून त्यांनी खळबळ उडवून दिली होतीच. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप ऐकवून दुसरा धमाका केला आहे. ही क्लिप किती खरी - किती खोटी, त्यात काही फेरफार करण्यात आलाय का, याची पडताळणी अद्याप झालेली नाही. पण या क्लिपमुळे भाजपाच्या अडचणी वाढू शकतात.
काय आहे ही फडणवीसांची कथित ऑडिओ क्लिप?
एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे... आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?...
ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही...
आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे...
ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा... साम, दाम, दंड, भेद...
ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे...
तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. 'अरे ला कारे'च करायचं. 'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे...