मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राजेंद्र गावित भाजपामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होता. गावित भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र या चर्चेत तथ्य नसल्याचं गावित यांनी स्पष्ट केलं. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. वनगा यांच्या कुटुंबानं गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळेच भाजपाकडून गावित यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. गावित यांना भाजपा प्रवेश देऊन त्यांना निवडणुकीचं तिकीट द्यायचं, अशी भाजपाची रणनिती असल्याची चर्चा होती. त्यामुळेच गावित यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. याठिकाणी काँग्रेस आणि भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. काँग्रेसचा उमेदवार 10 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय.
पालघर पोटनिवडणूकः भाजपा तोंडावर आपटली; राजेंद्र गावित म्हणाले, 'मी काँग्रेसमध्ये आहे आणि राहणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 3:20 PM