भाईंदर : मीरा रोडच्या श्रीकांत जिचकार चौकात नवीन नळजोडणीचा कार्यक्रम मीरा- भार्इंदर महापालिकेच्यावतीने होत आहे. मात्र सत्ताधारी भाजपाने मात्र याच कार्यक्रमाच्या स्वत:च्या पक्षाच्या निमंत्रणपत्रिका छापल्या आहेत. महिला दिनाच्या कार्यक्रमावेळी पालिकेची बनावट गिफ्ट कूपन छापल्याप्रकरणी प्रशासन कारवाई करत नसतानाच आता या प्रकरणीही पालिकेने मूग गिळून गप्प राहणेच पसंत केले आहे. मीरा- भार्इंदर महापालिकेच्या ७५ दशलक्ष लिटर पाणीयोजनेचे काम पूर्णत्वास आल्याने पहिल्या टप्प्यात २५ दशलक्ष लिटर पाणी मिळण्याचे सांगितले जात आहे. नवीन नळजोडणी सुरू करण्याच्यानिमित्ताने रविवारी सायंकाळी कार्यक्रम होणार आहे. पालिकेने निमंत्रणपत्रिका छापल्या असून त्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींची नावे आहेत. महापालिकेने रितसर निमंत्रणपत्रिका छापलेल्या असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपाने मात्र पालिका कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिका चक्क भाजपाच्या नावाखाली छापून त्याचे वाटपही सुरू केले आहे. भाजपाच्या प्रवक्त्यानेसुध्दा तशी पत्रिका सोशल मिडीयावर टाकली आहे. कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपाच्यावतीने देण्यात आले असून जिल्हाध्यक्ष हे निमंत्रक आहेत. विशेष म्हणजे स्थानिक स्तरावरील महापौरांचे छायाचित्र न टाकता केवळ आमदरांचेच छायाचित्र टाकण्यात आले आहे. या प्रकरणी महापालिका उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रीया दिली नाही. (प्रतिनिधी)भाजपाचे जुने उद्योगभाजपाचे हे असले उद्योग नवीन नसून पालिकेच्यानावे बोगस गिफ्ट कूपन छापणे, पालिकेच्या वास्तूंचे परस्पर उद्घाटन करणे, पालिकेचा कार्यक्रम असताना स्वत:च्या निमंत्रणपत्रिका छापणे आदी उपद्व्याप नागरिकांची दिशाभूल करून राजकीय श्रेय घेण्यासाठी सातत्याने केले जात आहे. प्रशासनाच्या संगनमतानेच पालिकेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक प्रमोद सामंत यांनी केला. अधिकाऱ्यांवर कारवाई कराउपमहापौर प्रवीण पाटील यांनीही पालिका प्रशासनच या बेकायदा प्रकारांना जबाबदार असून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. महिला दिनाच्या कार्यक्रमातही भाजपाने असाच उद्योग केला होता.
पालिका कार्यक्रमाचे भाजपाकडून निमंत्रण
By admin | Published: April 30, 2017 4:24 AM