बदलापूर : लॉकडाऊनच्या काळात रस्ते आणि चौक गिळंकृत करणाऱ्या फेरीवाल्यांच्या अरेरावीविरुद्ध गुरुवारी बदलापूर पश्चिमेतील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवत निषेध व्यक्त केला. गेल्या आठवड्यात एका दुकानासमोर बसलेल्या विक्रेत्याला रस्ता देण्याची मागणी करणाºया दुकानदाला विक्रेत्याने शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या बेकायदा अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी करत व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली होती. व्यापाºयांनी इशारा देऊनही पालिका प्रशासनाने अद्याप याप्रकरणी तोडगा काढलेला नाही.
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. याकाळात गर्दी टाळण्यासाठी भाजी मंडई बंद करून पालिका प्रशासनाच्या सहकार्याने फळे, भाजीविक्रेत्यांना शहरातील विविध चौकांत, रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करण्याची मुभा दिली होती. मात्र, गेल्या सात महिन्यांत विविध चौक, रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. सध्या अनलॉकनंतर शिथिलता आणत जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे शहरातील गर्दीच्या चौकात वर्दळ वाढली आहे. यापूर्वी बसलेले भाजी आणि फळविक्रेते अजूनही त्याच ठिकाणी बस्तान मांडून असून पालिका प्रशासनाने वाहतूक, गर्दीकडे दुर्लक्ष करत अजूनही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिक, वाहतूक आणि व्यापाºयांना बसत आहे. बदलापूर पश्चिमेतील स्थानक परिसरात दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणावर फेरीवाले बसतात.
याप्रकरणी पश्चिमेतील बाजारपेठ व्यापारी जनसेवा मित्र मंडळाने प्रशासनाकडे बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली होती. तसेच १ आॅक्टोबरपर्यंत कारवाई न झाल्यास बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, नगरपालिका प्रशासन आता या फेरीवाल्यांविरोधात कुठली कारवाई करते याकडे शहरातील व्यापारी, नागरिकांचे लक्ष लागले आहे.