अनिकेत घमंडी डोंबिवली : रिक्षाचालकांकडून होणारी जादाभाडे आकारणी, मीटर न टाकणे, उद्धट वर्तन, यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत; पण याबाबत नेमकी तक्रार कोणाकडे करायची, दाद कोणाकडे मागायची, याबाबत मात्र प्रवाशांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येतो. काही दक्ष नागरिक वाहतूक पोलीस वा आरटीओकडे तक्रारी, ई-मेल करतात; पण अशा नागरिकांचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रवाशांना तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला या मंचने ‘पाम’ या अॅपची निर्मिती केली असून, ते विनामूल्य तत्त्वावर उपलब्ध होणार आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २५ मार्चला या अॅपचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मंचच्या सदस्यांनी दिली. कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांची सोमवारी मंचच्या सदस्यांनी भेट घेतली. त्या वेळी त्यांना या अॅप बाबाबत माहिती देण्यात आली. या अॅपमुळे प्रवाशांची तक्रार अधिक जलदतेने आरटीओपर्यंत पोहोचेल आणि दोषी रिक्षाचालकांवर चाप बसेल, परिस्थिती नियंत्रणात राहील, असा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. मंचचे सचिन गवळी, प्रमोद काणे, अल्पा खोना आदीनी यासंदर्भात भेट घेतली होती. हा अॅप तयार करण्यासाठी नवी मुंबई येथील तुषार बापटे यांनी सहकार्य केल्याची माहिती गवळी यांनी दिली. या संदर्भात वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. अनेकदा अन्यायाला वाचा फोडण्याची इच्छा असतानाही प्रवाशांना ई-मेल करण्याचा कंटाळा, तो कसा करावा, त्यात काय नमूद करावे या तांत्रिक बाबी किचकट वाटल्याने, अथवा त्यामध्ये वेळ जात असल्याने तो जास्त पसंतीस येत नसल्याचे मंचच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रप्रणालीनुसार अॅप संकल्पनेतून ‘पाम’ अॅप तयार केल्याचे सांगण्यात आले. याआधी प्रवाशांना तक्रारीसाठी दिलेल्या ई-मेलसंदर्भात या वेळी माहिती घेण्यात आली. तो ई-मेल वापरात आहे की नाही, याची माहिती घ्यावी, त्यावर किती तक्रारी आल्या, त्यापैकी किती आताच्या आहेत, त्याची माहिती घेण्यासंदर्भात पाटील यांनी सहकाऱ्यांना सूचना दिल्या.अॅपद्वारे कशी करायची तक्रारज्या रिक्षाचालकासंदर्भात प्रवाशांना तक्रार आहे, त्यांनी संबंधित रिक्षाचा नंबर दिसेल असा फोटो, जमल्यास रिक्षाचालकाचा फोटो, तक्रारीचे स्वरूप, दिनांक, वेळ, ठिकाण, शक्य असल्यास व्हिडीओ असा तपशील अॅपवर द्यावा. तो देताच तातडीने आरटीओकडे ती तक्रार पोहोचेल आणि उपद्रवी रिक्षाचालकांना शिस्त लावण्याच्या दृष्टीने हालचाली होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.आरटीओची हेल्पलाइन बंद?आरटीओकडे थेट तक्रार करण्यासंदर्भात दिलेला हेल्पलाइन नंबर अनेक वर्षांपासून बंद आहे, त्याबाबतही आरटीओ अधिकाºयांनी लक्ष घालावे, त्या क्रमांकाचे काय झाले, तसेच नवा क्रमांक देण्यात येणार आहे का? असल्यास तो जाहीर करावा, अशी मागणी ‘पाम’ने केली. त्यावर पाटील यांनी माहिती घेऊन योग्य ती सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.