डोंबिवली: भिवंडी लोकसभा क्षेत्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीबद्दल पंचनामे करावेत, अशी विनंती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्याकडे मंगळवारी केली.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रविवार, सोमवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड आणि वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भाताच्या मळणीची कामे सुरू आहेत.
मात्र, अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरवून घेतला गेला. भात पिकाबरोबरच शेतकऱ्यांकडून भाजीपाला उत्पादनही घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान जाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई देण्याबाबत निर्देश द्यावे, अशी विनंती पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.