ठाणे : संगीतप्रेमी रसिकांसाठी मेजवानी ठरणारा, ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा अन् दिग्गज कलावंतांच्या कलेचा आनंद देणाऱ्या संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती समारोहाला शुक्रवारी ६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.संगीतासाठी उभे आयुष्य संगीतमय करणाऱ्यांचा सन्मान सोहळा हे या कार्यक्र माचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. याप्रसंगी ख्यातनाम बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांना संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्काराने, तर हार्मोनियम वाद्यासाठी फेलोशिपचे पहिले मानकरी ठरलेले अनंत जोशी यांना संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती युवा पुरस्काराने गौरवले जाणार आहे. हा कार्यक्रम ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडणार असून यावेळी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्र मात नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी कार्यक्र मांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. यावेळी ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर, अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित राहणार आहेत.
ठाण्यात आजपासून पंडित राम मराठे संगीत महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 5:29 AM