अंबरनाथ/बदलापूर : गेल्या दीड वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि तेवढाच कालावधी निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना आता पॅनल पद्धतीचा मोठा फटका बसणार आहे. पॅनल पद्धतीमुळे प्रभागाची रचना आणि त्याचे आरक्षण देखील बदलण्याची शक्यता असल्यामुळे आता अनेक इच्छुक उमेदवार बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र त्याच काळात कोरोनाची पहिली लाट आल्याने या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे निवडणुका कधीही होतील या आशेवर इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात कोरोना काळातदेखील मोठ्या प्रमाणात कामे केली. अर्थात त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आर्थिक भारही सोसावा लागला. हा आर्थिक भार सोसत पुन्हा मार्च २०२१ मध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने काम सुरू केले होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने त्या निवडणुकाही स्थगित करण्याची वेळ राज्य शासनावर आली. मात्र त्या दीड वर्षात इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात खर्च केला होता. दोन वेळा निवडणुका पुढे सरकल्याने या खर्चाचा फायदा त्यांना निवडणुकीत होईल की नाही? असा प्रश्न सर्व इच्छुक उमेदवारांसमोर आहे.
आता राज्य शासनाने एक सदस्य पद्धत रद्द करून द्विसदस्यीय पद्धतीने अर्थात पॅनल पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा फटका अंबरनाथ आणि बदलापुरातील इच्छुक उमेदवारांना बसणार आहे. इच्छुक उमेदवारांपैकी अनेक उमेदवार हे आरक्षणामुळे इतर प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी गेले होते. त्यामुळे नव्या निवडणूक प्रक्रियेमुळे पुन्हा आरक्षण बदलण्याची आणि प्रभागरचना बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका हा इच्छुक उमेदवारांना बसणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पॅनेल पद्धतीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे स्पष्ट केले. दुसरीकडे अंबरनाथमधील भाजपचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी या निर्णयामुळे भाजपला काहीएक फरक पडणार नाही आणि भाजपला पूर्ण यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
-----------
निवडणूक आयाेगाच्या आदेशाची प्रतीक्षा
- राज्य शासनाने पॅनल पद्धत निश्चित केली असली तरी ज्या पालिकांच्या निवडणुका दीड वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यांना हा आदेश लागू होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
- अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या आरक्षण सोडत आणि मतदारयाद्यांचेही काम झाले होते. त्यामुळे या आधीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द होणार की अस्तित्वातील प्रभागरचनेवरच पॅनल पद्धतीने निवडणुका घेणार, याबाबत निवडणूक आयोगाला आदेश काढावे लागणार आहेत.
- प्रत्यक्ष पॅनल पद्धत असल्यामुळे प्रभागांची रचना आणि प्रभागांच्या आरक्षण सोडत या नव्या पद्धतीने घेतल्या जाण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.