अंबरनाथ: अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या बाजूला काही अंतरावर वडवली केमिकल इंडस्ट्री असून या ठिकाणी असलेल्या केमिकल कंपन्यांनी रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गॅस सोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गॅस ला उग्र वास असल्याने नागरिकांना खोकल्याचा आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. एवढेच नव्हे तर गॅसचे प्रमाण एवढे होते की सर्वत्र धुक्यासारखे वातावरण निर्माण झाले होते.
शनिवारी रात्री 9:30 वाजता नेहरू उद्यानात समोरील केमिकल दोन मधून काही कंपन्यांनी उग्र वास असलेला गॅस सोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅसचे प्रमाण जास्त असल्याने सर्वत्र धुक्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. समोरचा व्यक्ती देखील दिसणार नाही तेवढ्या प्रमाणात गॅसचा थर निर्माण झाला होता. या गॅसला उग्र वास असल्याने नागरिकांना त्याचा त्रास देखील सहन करावा लागला. या भागातील नागरिकांनी घरातील दारे-खिडक्या बंद करून या गॅस पासून वाचण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर देखील दुर्गंधी मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांनी मदतीसाठी प्रशासनाला बोलाविले. हा प्रकार पाहून अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशामक दल देखील घटनास्थळी रवाना झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केमिकल झोनमधील कंपन्यांना केमिकल प्रक्रिया बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तब्बल तासभर हा गोंधळ परिसरात निर्माण झाला होता. याठिकाणी गॅस सोडण्याचे प्रकार नियमित घडत असतात, मात्र शनिवारी हा प्रकार जास्त प्रमाणात घडल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.