पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यातील रासायनिक टँक फुटून झालेल्या विषारी वायुगळतीमुळे एक महिला अत्यवस्थ झाल्याने तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य सहा कामगारांना किरकोळ बाधा झाली असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
प्रदूषण पसरविण्यात देशात एक नंबरची औद्योगिक वसाहत म्हणून तारापूर औद्योगिक वसाहतीने आपली ओळख निर्माण केली आहे. बेकायदेशीररीत्या विनापरवाना रासायनिक उत्पादने घेत अनेक निष्पाप कामगारांचे बळी घेणारी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखीच्या दिशेने आता औद्योगिक वसाहतीची वाटचाल सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नं. १६/२५ येथील केमिकॉन केमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. या रासायनिक कारखान्यात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रासायनिक टाकी फुटून त्यातील रसायनाचा हवेशी संपर्क होऊन विषारी वायूची निर्मिती होऊ लागली. या वायूच्या संपर्काने बाजूला असलेल्या कारखान्यातील कामगारांना त्रास होऊ लागला.
याची माहिती कामगारांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कारखान्यात रविवारी रात्री १७ टन रसायनाचा साठा आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. डब्ल्यू २४ या कारखान्यात काम करणारी महिला दामिनी सिंग (२१) हिला या विषारी वायूची बाधा झाल्याने उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल केले होते. तिची प्रकृती स्थिर असून अन्य सहा कामगारांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे.
कारखान्यांची होणार चौकशी
अग्निशमन दलाच्या जवानांनी आॅक्सिजन सिलिंडर लावून कारखान्यात पसरलेल्या रसायनावर कॉस्टिक सोडा टाकून रसायनाचे व त्यातून निघणाऱ्या वायूचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केल्याने त्याची दाहकता काही वेळाने कमी झाली. या वेळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तसेच १०-१२ कर्मचारी उपस्थित होते. या घटनेबाबत अपघाताची नोंद बोईसर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून कारखान्यांची चौकशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग करत आहे.