भिवंडी : स्वच्छ मुख अभियानाच्या शुभारंभाच्या ठिकाणी जमलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सामना करावा लागू नये म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तालुक्यातील सोनाळे गावातील सोमवारच्या कार्यक्रमाला दांडी मारली. यामुळे भाजपाला झटका बसला असून ग्रामस्थांनीही नाराजी व्यक्त केली.गांधी जयंतीनिमित्त सोनाळे ग्रामपंचायतीतील ग्रामसभेला मुंडे उपस्थित रहाणार होत्या. त्यांच्या हस्ते स्वच्छ मुख मोहिमेचा शुभारंभ होणार होता. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळपासून गुलाबी साडीतील शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी उपस्थित राहून मंत्र्यांची प्रतीक्षा सुरू केली. ते समजताच त्यांनी भिवंडीचा दौरा रद्द केला. अंगणवाडी सेविकांनी मात्र ‘रघुपती राघव राजाराम, पंकजा मुंडेंना सद््बुद्धी दे भगवान’ असे भजन म्हणत उपस्थितांची करमणूक केली.खासदार कपिल पाटील यांनी सोनाळे ग्रामपंचायत आदर्श सांसद ग्राम म्हणून जाहीर केली आहे. ती ग्रामपंचायत सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. तेथील कार्यक्रमात अंगणवाडी सेविका थडकल्याने खासदारांनी हा शासकीय कार्यक्रम उरकुन घेतला. ही संधी साधत सेनेचे आ. रूपेश म्हात्रे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची घोषणा केली. जि.प. आणि पं.स.च्या निवडणुकीचे वातावरण तापत असताना कार्यक्रमानिमित्ताने भाजपा व सेना एकमेकांसमोर उभे ठाकले.
भाजपाला झटका, अंगणवाडी सेविकांमुळे पंकजा मुंडेंची ‘दांडीयात्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:37 AM