- पंकज पाटील
बदलापूर : बदलापुरात दोन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने बदलापुरातील नागरिकांच्या मनात वर्षानुवर्षे खदखदत असलेल्या असंतोषाचा स्फोट झाला. दररोज होणारी लोकलची रखडपट्टी व गर्दीमुळे होणारे हाल, अनेक भागात पाण्याची टंचाई, पावसाळ्यात साचणारे पाणी, रस्त्यांवरील खड्डे, रिक्षाचालकांची मनमानी, फेरीवाल्यांची मुजोरी, स्थानिक नेत्यांची बेफिकिरी, पोलिसांची बेपर्वाई अशा असंख्य कारणांमुळे बदलापूरमधील रहिवाशांच्या मनात संताप धुमसत होता.
डोंबिवलीनंतर मराठमोळ्या रहिवाशांचे शहर ही ओळख असलेल्या बदलापुरात रेल्वेपासून नगरपालिकेपर्यंत अनेक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत. केवळ तुलनेने स्वस्तात फ्लॅट मिळतात म्हणून लोक बदलापूरमध्ये येतात. कर्जत, नेरळ वगैरे भागातील घरे विकून काहींनी बदलापूरला पसंती दिली. मात्र, हालअपेष्टा संपलेल्या नाही. बदलापुरातून हजारो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र, अंबरनाथमधून प्रवासी उलटे बसून बदलापूर लोकलमधून येत असल्याने बदलापूरमधील प्रवाशांना उभे राहावे लागते.
खोपोली, कर्जतवरून येणाऱ्या लोकल भरगच्च भरलेल्या असल्याने बदलापूरमधील प्रवाशांना बरेचदा त्यात प्रवेश करता येत नाही. लोकलचा कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान होणारा खोळंबा जीवघेणा असतो. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या स्थानकात लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते. डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यात नोकरी करणाऱ्यांना डोंबिवली स्थानकात उतरता येत नाही. बदलापूरकर प्रवाशांच्या या समस्यांची कुणीच दखल घेत नाही. वर्षभरापूर्वी सीएसएमटीवरून येणारी साधी लोकल रद्द करून त्या ठिकाणी एसी लोकल सुरू केल्याने बदलापुरातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता.
तपासासाठी याचिका लैंगिक अत्याचारप्रकरणाच्या तपासासाठी सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) तपास न्यायालयीन देखरेखेखाली करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात अॅड. अजिंक्य गायकवाड यांनी दाखल केली. न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. मात्र न्यायालयाने या याचिकेवर एकलपीठापुढे नाही, तर खंडपीठापुढे सुनावणी होऊ शकते, असे म्हणत सुनावणी घेण्यास नकार दिला.
फलाटावर अपुऱ्या सुविधा स्टेशन परिसरातील पार्किंगचा घोळ, रिक्षा स्टॅन्डचा घोळ यामुळे घर गाठेपर्यंत रहिवाशांची दमछाक होते. बदलापूरमधील रस्त्यांना खड्डे असून अनेक भागात रस्त्यांवर दिवे नसतात. पावसाळ्यात उल्हास नदीला पूर आल्याने बदलापूरमधील पूररेषाच्या आत असलेल्या अनेक इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या मालमत्तेचे नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे बदलापूरकर प्रचंड संतापले होते. सोनसाखळी चोरी व अन्य गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या गैरकारभाराबद्दल नाराजी होतीच. दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व त्या प्रकरणात गुन्हा दाखल करताना झालेली बेफिकीरी यामुळे रोष व रेल्वेच्या हालअपेष्टांबद्दलचा संताप असा बाहेर पडल्याची चर्चा आहे.