- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील नगराध्यक्ष, महापौर, स्थायी समिती सभापती, आमदार आदी महत्त्वाचें पदे भूषविणाऱ्या ज्योती कलानी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले. त्यापैकी खेमानी येथील ज्योती कलानी चौक उदघाटन वेळी पप्पु कलानी यांना गहिवरून येऊन पत्नीच्या पाठींब्यामुळे आज आपल्या सोबत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
उल्हासनगर म्हणजे पप्पु कलानी असे समीकरण निर्माण करणारे पप्पु कलानी गेल्या काही महिन्यांपासून शहरात सक्रिय झाले. शहरात कलानीमय वातावरण निर्माण करणारे पप्पु कलानी यांच्या कलानी महालावर राजकारणातील दिग्गजांनी हजेरी लावली असून शहरातील बहुतांश पक्षाचे नेते त्यांच्या गळ्यात गळा घालतांना दिसत आहे. यामधून कट्टर विरोधक असलेले आमदार कुमार आयलानी हेही सुटले नाही. गेल्या वर्षी माजी आमदार ज्योती कलानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यावर सर्व शहरावर शोककळा पसरली होती. पप्पु कलानी १९९२ व नंतर जन्मठेपेच्या शिक्षेत जेल मध्ये गेल्यानंतर राजकीय व कुटुंबाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपने सांभाळून कलानी परिवाराचा राजकीय दबदबा कायम ठेवला.
माजी आमदार ज्योती कलानी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त मंगळवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कलानी महल शेजारील मुख्य खेमानी चौक व रस्त्याचे नामकरण ज्योती कलानी असे झाले. मंगळवारी ज्योती कलानी चौक नामफलकाचे उदघाटन पप्पु कलानी, माजी महापौर हरदास माखिजा, माजी नगरसेवक मनोज लासी, कलानी समर्थक अजित माखिजानी यांच्या हस्ते रात्री झाले. यावेळी पप्पु कलानी यांनी आज जे काही मी आहे. ते पत्नी ज्योती कलानी यांच्या पाठिंबामुळे असल्याचे सांगून, काही आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांना गहिवरून आले होते. सर्वांनी ज्योती कलानी यांच्या आठवणीला उजाळा दिला.
ज्योती महिला शक्ती फौंडेशनची स्थापना
माजी महापौर पंचम कलानी यांच्या पुढाकाराने, गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी ज्योती महिला शक्ती फौंडेशन या समाजसेवी संस्थेची स्थापना केली. यावेळी सीमा कलानी यांच्यासह महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे पंचम कलानी म्हणाल्या. पंचम कलानी ह्या ज्योति कलानी यांच्या सुनबाई आहेत.