लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पालघर जिल्ह्याच्या जात पडताळणी कार्यालयातील कारभार अतिशय संथगतीने सुुरु असल्याने जात पडताळणीची कामे रखडून पडली आहेत. त्यामुळे जातीचे दाखल मिळवणे आणि त्याची पडताळणी करणे यासाठी शेकडो पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी तक्रार सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील मागासवर्गीयांच्या जात पडताळणीसाठी सरकारने २१ आॅक्टोबर २०१६ पासून कार्यालय सुुरु केले आहे. या कार्यालयातील कारभार अतिशय संथ गतीने सुरु असल्याने जात पडताळणी प्रमाणपत्रे मिळणे अवघड होऊन बसले आहे. पूर्वी वसई तालुक्यातील रहिवशांना जातीचे दाखले भिवंडी प्रांत कार्यालयातून घ्यावे लागत होते. त्याची पडताळणी कोकण भवन येथे जाऊन करावी लागत असे. आता वसई प्रांत कार्यालयातून मिळालेल्या दाखल्यांची पडताळणी पालघर येथून करावी लागते आहे. पूर्वीच्या दाखल्यांची पडताळणी आजही कोकण भवन येथूनच करावी लागत असल्याने लोकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पालघर कार्यालयात आजपर्यंत सुमारे अडीच हजार प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यातील जेमतेम सहाशे प्रकरणात दाखले दिले गेले आहेत. सहाशे प्रकरणे उत्तरासाठी तर सहाशे पेक्ष अधिक प्रकरणे अध्यक्ष आणि उपाध्याक्षांच्या सह्यांसाठी प्रलंबित राहिली आहेत. तर नव्याने आणखी तीनशे प्रकरणे दाखल झाली आहेत. या कार्यालयातील कामाचा वेग अतिशय मंद असल्याने प्रकरणांचा निपटारा लवकर होत नाही आणि लोकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची त्यांची तक्रार आहे. पालघर जिल्हयातील शेकडो नागरीकांना जातीचे दाखले मिळालेले नाहीत. ज्यांना मिळालेले आहेत त्यांची पडताळणी होत नाही. जूनमध्ये शाळा-कॉलेज प्रवेश सुरु होत असून त्यावेळी जातीचे दाखले व पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पडताळणी कार्यालयाच्या कामाची गती वाढवावी अशी त्यांची मागणी आहे.
जातपडताळणीसाठी होतेय परवड
By admin | Published: June 02, 2017 4:50 AM