ठाणे: ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध साडेसात कोटींच्या खंडणी वसुलीच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी आर. जे. तांबे यांनी बुधवारी यातील एक आरोपी तारीक परवीन शेख (६०) याला सशर्त जामीन मंजूर केला.
या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदत पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या मुदतीत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले नाही. याच तांत्रिक कारणामुळे न्यायालयाने परवीन या आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केल्याची माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.
तारीक याला १५ हजारांचा जामीन मंजूर केला. या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकदाही आपल्याशी संपर्क साधलेला नसून ते या गुन्ह्यातील कोणतीही माहिती देत नाहीत, असा आरोप पुन्हा एकदा विशेष सरकारी वकिलांनी बुधवारी केला. त्यांनी यापूर्वी या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांविरुद्ध राज्याचे गृहसचिव तसेच पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे.
राज्य शासनाने या प्रकरणात विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती करूनही जर वेळेत आरोपपत्र दाखल करीत नसतील, तर आरोपी आणि तपास अधिकारी यांच्यात काहीतरी साटेलोटे झाल्याचा संशय यातील तक्रारदार सोनू जलान यांनी व्यक्त केला. आपण यासंदर्भात लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही आपण तक्रार करणार असल्याचे फिर्यादी जालान यांचे वकील सागर कदम यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे खटल्याकडे लक्ष लागले आहे.