तीन कोविड रुग्णांच्या मृत्यूमध्ये मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन : नोटिसांना दिले नाही उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा रोडच्या इंद्रलोक फेज - ६ भागातील श्री परमहंस रुग्णालयाची कोविड उपचारासाठी दिलेली मान्यता आयुक्त दिलीप ढोले यांनी रद्द केली. तीन कोविड रुग्णांच्या मृत्यूबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा बजावूनदेखील रुग्णालय प्रशासनाने खुलासा दिला नाही. त्यामुळे प्रशासनाने हे पाऊल उचलले.
श्री परमहंस रुग्णालय २० खाटांचे असून १४ ऑक्सिजन बेड, ६ अतिदक्षता बेड व २ व्हेंटिलेटर बेड अशी रुग्णालयाची क्षमता आहे. या रुग्णालयास कोरोना रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेने परवानगी दिली होती. परंतु रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या, रुग्णांवरील उपचारातील त्रुटी आणि गैरव्यवस्थापन आदी तक्रारी येत होत्या.
पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या डॉ. अंकिता पंडित यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. डॉ. अंकिता यांनी पाहणी करून २० एप्रिलपासून १ मेपर्यंत तीन नोटिसा रुग्णालयास बजावल्या होत्या. परंतु त्याचा खुलासा रुग्णालयाने केला नाही. ३ मे रोजी वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णालयास भेट देऊन समक्ष खुलासा सादर करण्यास सांगूनसुद्धा रुग्णालयाने खुलासा न दिल्याने अखेर ५ मे रोजीच्या अहवालानुसार गुरुवारी आयुक्त ढोले यांनी रुग्णालयाची कोविड उपचाराची परवानगी रद्द केली.
रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने मृत्यू अन्वेषण समितीपुढे वारंवार सांगूनदेखील रुग्णालय व्यवस्थापन हजर झाले नाही. समितीने आढावा घेतला असता तीन कोरोना रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी उपचारासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले गेले नाही, असे स्पष्ट झाले. उपचारात गंभीर त्रुटी आढळून आल्या. अखेरीस रुग्णालयाची कोविड मंजुरी रद्द करण्यात आली.
...........
वाचली.