शरद पवार गटातील यादीत अजित पवार गटाची नावे, परांजपे यांनी केला दावा
By अजित मांडके | Published: October 23, 2023 05:22 PM2023-10-23T17:22:03+5:302023-10-23T17:22:20+5:30
दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणी जाहीर झाली होती.
ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाने जी कार्यकारणीची यादी जाहीर केली. त्यातील काही नावे ही अजित पवार गटाची असल्याचा दावा आता शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा दोनही गट आमने सामने येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून यादी सादर केली गेली मात्र त्या यादीवरुनच आता परांजपे यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यात सोमवारी परांजपे यांनी ठाणे महापालिका शिक्षण मंडळाचे तत्कालिन उपाध्यक्ष शशिधर जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी तर सुनील पाटील यांची ठाणे शहर (जिल्हा) चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव उपस्थित होते.
दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणी जाहीर झाली होती. यात अनेक नवीन जुन्या चेहºयांना संधी देत भरगच्च यादी जाहीर झाली होती. परंतु या यादीवरच अजित पवार गटाने बोट ठेवले आहे. यादीत ज्या पदाधिकाºयांना पदे देण्यात आली आहेत. त्यातील काही पदाधिकारी हे अजित पवार गटात आधीच सहभागी झाले असून त्यांना महत्वाची पदेही देण्यात आल्याचा दावा शहर अध्यक्ष परांजपे यांनी केला आहे. त्यामुळे किमान आपल्या गटात कोण कोणते पदाधिकारी आहेत, याची तरी माहिती घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
परांजपे यांनी केलेल्या दाव्यामुळे पदाधिकारी देखील आता संभ्रमीत झाले आहेत. त्यातही कोण कुठे हे अद्यापही चित्र स्पष्ट झाले नसल्याचेच दिसत आहे. राष्टÑवादी दोन गटात विभागल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते हे आजही संभ्रमात आहेत, कधी इकडे तर कधी तिकडे अशा द्विधा मनस्थीत ते असल्याचे दिसत आहेत. त्यांनाही दोन गट झाल्याचे पचनी पडलेले नाही. परंतु असे असतांना सर्वांना आपलेसे करण्यासाठी आधी अजित पवार गटाने आॅगस्ट महिन्यात कार्यकारणी जाहीर केली होती. त्यात अनेकांना संधी दिली होती, त्यानंतर दोन दिवसापूर्वी जाहीर झालेल्या शरद पवार गटानेही आपली भरगच्च यादी जाहीर केली आहे. परंतु त्यात अजित पवार गटाचे चार ते पाच चेहरे दिसल्याचा दावा परांजपे यांनी केला आहे. हे पदाधिकारी आधी पासूनच आपल्या सोबत आहेत, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या पदांवरुन आता पुन्हा शरद पवार व अजित पवार गट आमने सामने येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.