लोकमत नेटवर्क
ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली दुर्बल घटक आणि मागासवर्गीय परिवारांतील बालकांना त्यांच्या जवळच्या शाळेत २५ टक्के शालेय प्रवेश मोफत दिले जात आहेत. यासाठी जिल्ह्यातील नऊ हजार ८८ मुलांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली. यापैकी पाच हजार १९१ जणांनी १२ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित केले आहेत. उर्वरित तीन हजार ८९७ बालकांना त्यांना मिळालेल्या शाळेत २३ जुलैपर्यंत जाऊन पाल्याचा शालेय प्रवेश घेण्याची संधी दिली आहे.
यंदा जिल्ह्यातील ६६९ शाळांमध्ये या नऊ हजार ८८ बालकांच्या शालेय प्रवेशाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षणाचा हक्क म्हणजे ‘आरटीई’ कायद्याखाली या बालकांना त्यांना दिलेल्या शाळेत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लॉटरी सोडतद्वारे निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना सीनिअर केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेसाठी नऊ हजार ८८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. मात्र, यातील अवघ्या पाच हजार १९१ जणांनीच प्रवेश घेतले आहेत. तर, तीन हजार ८९७ बालकांचे मात्र प्रवेश झाले नाहीत.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे प्रवेश रखडले होते. पण यंदा आर्थिक चणचण जाणवत असल्याने इच्छा असून पालक बालकांना त्यांना मिळालेल्या चांगल्या शाळेत पाठवायला तयार नाहीत. प्रवेश मोफत मिळत असला तरी या शाळांच्या नियमानुसार त्यांचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासह बसचा अवाढव्य खर्च, अन्यही आडमार्गी लागणारा खर्च पेलवण्याची क्षमता नसल्यामुळे पालकांनी या शाळांकडे पाठ फिरवलेली असल्याचे ऐकायला मिळत आहे.