ठाणे: शिक्षणपद्धती बदलत आहे त्याचबरोबर पालकांनी देखील बदलले पाहिजे. आपल्या पाल्याला समदून घेऊन त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पाठिंबा दिला पाहिजे असे मत ठाणे पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी व्यक्त केले. शिक्षण कधी वाया जात नाही हे सांगताना सायबर गुन्हा उलगडत असताना त्यांना कम्प्युटर सायन्सचा कसा फायदा झाला हेही त्यांनी प्रेक्षकांसमोर उलगडले.
कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा महिला विभाग आणि आनंद विश्वगुरुकुल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयात रविवारी दक्षिण आफ्रिकेतील किलोमांजारो हे जगातले पाचव्या क्रमांकाचे शिखर काबीज करणाऱ्या पहिल्या महिला हा मान मिळवणाऱ्या अमृता भालेराव, उपायुक्त अंबुरे, कवयित्री व गायिका रुपाली अंबूरे आणि अंध बँक कर्मचारी व अंध व्यक्तींसाठी भरघोस कार्य करणाऱ्या अनुजा संखे या मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांचे अनुभव व त्यांचा कार्यप्रवास प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवण्यात आल्या. भालेराव यांनी उणे दहा इतके तापमान असताना , कोरोना सारख्या विषम परिस्थितीमध्ये अनेक संकटांवर मात करून शिखर कसे काबीज केले हे रोमांचकारी अनुभव कथन केले. अंध बँक अधिकारी संखे यांनी आपल्याला आलेले अंधत्व आणि त्यावर मात करून घेतलेले शिक्षण , बँक अधिकारी होण्याचा प्रवास , विविध प्रकारचे लेखन व पुस्तक प्रकाशन असा आपला विविधांगी प्रवास करताना शारीरिक अपंगत्व कसे मध्ये आले नाही हे सांगून उपस्थितांना एक नवी दृष्टी दिली. या तिघींचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. कसे जगावे हा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे तो आपण शिकला पाहिजे असे प्रतिपादन कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमीता कीर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तन्वी हर्बलच्या डॉ मेधा मेहेंदळे यांनी आपल्या मनोगतात या कार्यक्रमाचा उल्लेख साहित्याची भूक वाढविणारा कार्यक्रम असा करून संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी केले. यावेळी जिल्हा महिला प्रमुख जेष्ठ कवयित्री नितल वढावकर, आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते आदी उपस्थित होते. तपस्या नेवे यांनी सुत्रसंचालन तर पाहुण्यांचा परिचय प्रा. मनिषा राजपूत व संध्या लगड यांनी केला.