भाईंदर : भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनाऱ्यावर (Uttan Beach) कार पार्क करणे एका व्यक्तीला चांगलेच भोवले आहे. समुद्राला भरती आहे, येथे कार लावू नका, असे तेथील मच्छीमार आणि रिक्षा चालकांनी सांगूनही त्याने ऐकले नाही आणि आपली झायलो गाडी समुद्र किनारीच पार्क करून तो निघून गेला. यानंतर भरती वाढल्याने ही गाडी समुद्रात वाहून जाऊ लागली. मात्र, तेथील काही मच्छीमारांनी धाव घेत, अथक प्रयत्न करून ती बाहेर काढली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ही झायलो गाडी वाहून जात असताना काही मच्छिमार तिला बाहेर काढण्यासाठी धावले. समुद्रात जाऊन त्यांनी गाडी धरून ठेवली आणि नंतर ते दोरखंडाच्या सहाय्याने ती बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, गाडीचे स्टेअरिंग लॉक असल्याने गाडी बाहेर काढणे अवघड झाले. अखेर जवळपास चार-साडेचार तासांनंतर त्यांनी जेसीबी बोलावला आणि ती गाडी बाहेर काढली.