- राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरातील पार्किंग लवकरच महाग होणार असुन त्याचा सुमारे ४० ते ३०० टक्के दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडून येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
शहरात रस्त्यांच्या तुलनेत वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असून त्यांच्या पार्किंगसाठी मात्र जागा अपुरी पडु लागली आहे. त्याला पर्याय म्हणून पालिकेने शहरातील मोकळ्या नागरी सुविधा भूखंडावर वाहनतळ सुरु करण्यासाठी १० एप्रिल २००८ रोजीच्या महासभेत वाहनतळाच्या जागांसह पार्कींगचा दर प्रस्तावित केला. त्यातील मीरारोड पुर्व रेल्वे स्थानक परिसर (आरक्षण क्रमांक १८४), भार्इंदर पश्चिमेकडील स्कायवॉक खालील जागा, भार्इंदर पुर्वेकडील नवघर परिसरातील नागरी सुविधा भुखंड (आरक्षण क्रमांक २६४ए) वर वाहनतळ सुरु करण्यास सभागृहाने मान्यता दिली. त्यातील खाजगी ते व्यावसायिक वाहन पार्कींगचा दर प्रती ६ तासांसाठी १ रुपया ते २५ रुपये, १२ तासांसाठी ३ ते ५० रुपये २४ तासांसाठी ५ ते १०० रुपये व एका महिन्याच्या पासाकरीता १०० ते २५०० रुपये दर निश्चित करण्यात आला. त्याचे कंत्राट खाजगी कंपन्यांना देण्यात आले. १९ वर्षांपुर्वी निश्चित झालेले दर वाढत्या महागाईमुळे अत्यल्प असल्याने पालिकेला कमी उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे त्या दरात यंदा वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडुन येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत सादर केला जाणार आहे. दरम्यान मोकळ्या जागेत पार्क करण्यात येणा-या वाहनांच्या चोरींचे तसेच वाहनांतून पेट्रोलचोरी प्रमाण वाढल्याने वाहनांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने खुल्या जागेतील वाहनतळासह बंदिस्त वाहनतळाची संकल्पना वेगवेगळ्या दरवाढीनुसार प्रस्तावित करणार आहे. खुल्या जागेतील वाहनतळातील खाजगी व व्यावसायिक वाहन पार्किंगच्या दरात प्रशासनाने ४० ते ३०० टक्के वाढ प्रस्तावित केली असून बंदिस्त वाहनतळातील पार्किंगच्या दरात ८० ते ३०० टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. खुल्या जागेतील वाहनतळातील प्रती ६ तासांसाठी ३ ते ३५ रुपये, १२ तासांसाठी ५ ते ७० रुपये, २४ तासांसाठी १० ते १४० रुपये व मासिक पासासाठी १५० ते ३००० रुपये दर प्रस्तावित करण्यात आला आहे. बंदिस्त वाहनतळातील दर प्रती ६ तासांसाठी २२ रुपये ५० पैसे ते ४५ रुपये, १२ तासांसाठी ३० ते ५२ रुपये ५० पैसे, २४ तासांसाठी ३७ रुपये ५० पैसे ते १०५ रुपये, मासिक पासासाठी ५२५ ते २२५० रुपये दर प्रस्तावित करण्यात आला आहे. खुल्या जागेतील वाहनतळाच्या तुलनेत बंदिस्त वाहनतळातील पार्कींगच्या दरात प्रशासनाने मात्र कपात केली असुन बंदिस्त वाहनतळातील पार्कींगला वाहनचालक पसंती देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्यातून पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.