ठाणे : ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड सेंटरकरिता लिंडे कंपनीकडून १५ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झाला असून, येत्या दोन दिवसांत आयसीयु आणि ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
ठाणे शहराला ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरू झाला आहे. येथील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अतिदक्षता विभागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना ठाणे कोविड रुग्णालयात स्थलांतरित केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीसोबत तत्काळ संपर्क करून महापालिका प्रशासनाला ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. याबाबत महापौर म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपीन शर्मा यांनीही पाठपुरावा केला होता. त्यानुसार या कंपनीकडून दररोज १५ टन ऑक्सिजन साठा प्राप्त होणार असून, गुरुवारी ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पार्किंग प्लाझामधील आयसीयु आणि ऑक्सिजन बेड टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहेत.