डोंबिवली: शहरातील वाहतूक नियंत्रण विभागात कार्यरत असणाऱ्या दोन टोर्इंग व्हॅन तीन दिवसांपासून कंत्राट संपल्याने बंद आहेत. त्यामुळे सध्या शहरात कोणीही कुठेही पार्किंग करा, असे चित्र दिसून येत आहे. नव्याने लावण्यात येत असलेले नो पार्किंग बोर्डदेखील नावालाच असल्याची टीका सर्वत्र होत आहे.शहरात एका खासगी बँकेच्या सहाय्यने स्थानक परिसरासह ठिकठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात येत आहेत. परंतु ते बोर्ड लावल्यापासून टोर्इंग व्हॅनचे कंत्राट संपुष्टात आले आहे. त्यामुळे गाड्या उचलल्या जात नसल्याने कोणीही कुठेही दुचाकी, चारचाकी गाड्या पार्क करत आहेत. वाहतूक नियंत्रण विभाग आणि वॉर्डन यांना याबाबत विचारले असता, त्यांनी याबद्दल अनभिज्ञता दर्शवत वरिष्ठांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानुसार कार्यालयाशी संपर्क साधला असता, टोईंग व्हॅनचे कंत्राट संपले असून ठाण्याहून त्याला लवकरच पुर्नमंजुरी मिळेल आणि त्यानंतर पुन्हा नियमबाह्य गाड्या पार्क करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.सध्या कारवाई होत नसल्याने स्थानक परिसरातील पूर्वेकडील दिशेला रामनगर, पाटकर रोड, स्टेशन परिसर, शिवमंदिर रोड, टाटा लेन, फतेह अली रोड, फडके रोड आदी भागात दुचाकीस्वार वाहने कशीही पार्क करत आहेत. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांसह व्यापारी वर्गाला होत आहे. वाहनांवर कारवाई तातडीने व्हावी, अशी मागणी जोर धरत असली तरी. शेकडो वाहनांवर कारवाई करतांना वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळ नसल्याचे सांगण्यात आले. तसेच संध्याकाळी, सकाळी गर्दीच्या वेळेत हमरस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करणे, कोंडी सोडवण्यावर भर द्यावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
डोंबिवलीत सर्रास कुठेही पार्किंग; टोर्इंग व्हॅनचं कंत्राट पुर्नमंजुरीच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 6:53 PM