बदलापूर : बदलापूरमध्ये नगरपालिका कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात गाड्यांची पार्किंग होत असून परिणामी या भागात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. याकडे वाहतूक पोलीस मात्र दुर्लक्ष करत असून बेकायदा पार्किंग बंद करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
बदलापूर शहरात मागील काही वर्षांत चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने शहरात जवळपास दररोज वाहतूक कोंडी होत असते. बदलापूर नगरपालिकेच्या कार्यालयात दररोज आपल्या कामानिमित्त अनेक जण येतात. मात्र हे लोक आपल्या गाड्या नगरपालिकेसमोरील मुख्य रस्त्यावर पार्क करतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गेल्या काही काळात वाढली आहे. रस्त्यावर डबल पार्किंगचे प्रमाण वाढल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. उड्डाणपुलावरून बदलापूर पश्चिमेकडून येणाऱ्या गाड्या याच भागात उतरतात. मात्र पुढे रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांमुळे रस्ता अरुंद होत असून या गाड्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे काही वेळा तर दत्त चौकापर्यंत या गाड्यांच्या रांगा जातात. या अनधिकृत पार्किंगवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.