- पंकज पाटीललोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ/बदलापूर : शहरात नव्याने सुरू झालेले हुक्का पार्लर हे थेट राज्य महामार्गावरच थाटले आहेत. या हुक्का पार्लरमध्ये येणाऱ्यांची गर्दी ही पोलिसांच्या दृष्टिक्षेपातही असते. मात्र, तरीही या हुक्का पार्लरवर कधीच कारवाई होत नाही. पोलिसांचा आशीर्वाद असल्यानेच शहरातील हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यामुळेच बदलापूरसारख्या सुसंस्कृत शहरात हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाला यावे लागले. हुक्का पार्लर चालविणारे आणि हुक्का पार्लरमध्ये येणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असले, तरी या हुक्का पार्लरकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई झाली नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल.
अंबरनाथ आणि बदलापुरात हुक्का पार्लरची संस्कृती सुरू होण्यास केवळ पोलीस प्रशासन जबाबदार आहे. या आधी या दोन्ही शहरांत ढाबा संस्कृती प्रचलित झाली होती. कोणतेही लायसन्स नसतानाही या ढाब्यांवर दारू पिण्याची आणि दारूविक्रीची संस्कृती सुरू झाली. पोलीस आणि ढाबे मालकांची आर्थिक मैत्री जगजाहीर झाल्यावर आता याच ढाबा मालकांपैकी काहींनी आता आपल्या ढाब्यांवर हुक्का पार्लर सुरु केले आहे. पोलिसांना ‘सेक्शन’ दिल्यावर सर्वकाही सुरळीत चालविणे शक्य असल्यानेच हुक्का पार्लर संस्कृती प्रचलित झाली आहे. बदलापुरातील ‘सक्सेस पॅाइंट’ हा त्यातील एक मोठा हुक्का पार्लर. एकाच वेळी ७० ते ८० तरुण एकाच ठिकाणी बसून हुक्काचा आस्वाद घेतात. रात्री दोनपर्यंत हे पार्लर सुरू असते. शनिवार आणि रविवारी या ठिकाणी बसण्यासाठी जागाही नसते. शनिवार आणि रविवारी तब्बल दोन ते तीन लाख रुपये केवळ हुक्कामधून उत्पन्न मिळते, तर इतर दिवशी लाखभर रुपयांचा व्यवसाय नियमित होतो. या हुक्का पार्लर संस्कृतीला बळकटी देण्याचे काम स्थानिक पोलीस प्रशासनानेच केले आहे.
बदलापूरपाठोपाठ अंबरनाथमध्येही चिखलोली पट्ट्यात हुक्का पार्लर सुरू होते, तसेच बारकूपाडा भागातही हुक्का पार्लर संस्कृती रुजविण्यात पोलिसांची मदत झाली आहे. विशेष म्हणजे ठाण्याच्या पथकाने बदलापुरात हुक्का पार्लरवर कारवाई केल्यावर अंबरनाथच्या हुक्का पार्लरवरही कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, अंबरनाथचे पोलीस प्रशासन एवढे प्रामाणिक आहे की, त्यांनी कारवाईनंतर लागलीच दोन दिवसांनंतर बारकूपाडा भागात हुक्का पार्लरवर कारवाई करण्याऐवजी त्या ठिकाणी हुक्कयाचा धूर उडविणाऱ्यांना हुसकाविण्याचे काम केले. त्यांच्यावर कोणतीच ठोस कारवाई केली नाही. पोलिसांच्या या दिखाऊपणामुळे तरुणाईला उध्वस्त करु पाहत असलेल्या हुक्का संस्कृतीला चाप बसण्यास विलंब होणार हे मात्र निश्चित.
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये कोणत्याही हुक्का पार्लरला रितसर परवानगी नाही. यापुढे कोणतेही हुक्का पार्लर सुरू राहणार नाही. कोणी तसा प्रयत्न केला, तर पथकामार्फत त्यावर कारवाई केली जाईल. - विनायक नरळे, सहायक पोलीस आयुक्त.
सारा खेळ पैशांचा... असे आहे अर्थकारणnशहरात थाटलेले हुक्का पार्लरची पोलिसांना अथवा स्थानिक प्रशासनाला माहिती नाही, अशातला भाग नाही. मात्र या क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हुक्का पार्लरचे अर्थकारणच एवढे मोठे आहे की, यंत्रणा त्याकडे आपसूकच डोळेझाक करते. या जाणीवपूर्वक केल्या जाणारा दुर्लक्षाचा पुरेपूर मोबदला सर्व संबंधित यंत्रणांना नियमित स्वरुपात दिला जातो. पोलिसांसह इतर यंत्रणाही आपआपला वाटा घेऊन गप्प बसतात.nएका हुक्का पार्लरची रविवारी, एका दिवसाची कमाई ३ ते ४ लाखांच्या घरात असते. या धंद्यातील गुंतवणुकीच्या तुलनेत नफ्याचे प्रमाण जास्त असल्याने घसघशीत हफ्ते पार्लरच्या मालकांकडून दिले जातात. म्हणूनच या अवैध धंद्याबाबत प्रसारमाध्यमांमधून ओरड झाली की पोलीस यंत्रणा तेवढ्यापुरती कारवाई करुन हात वर करते. मात्र त्यामुळे तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त होत असून, पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.