ठाणे : ठाण्यात गाजलेल्या परमार आत्महत्या प्रकरणात तुरुंगात गेलेल्या चार नगरसेवकांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आहे. त्यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने थेट परमार यांच्या मुलालाच प्रचारात सहभागी करून घेतले. वर्तकनगर भागात परमार यांचा मुलगा अभिषेक हा शिवसेनेच्या प्रचार रॅलीत दिसत होता. सुरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांची नावे होती. वर्तकनगर पट्ट्यात तिघे आणि मुल्ला हे राबोडीतून निवडणूक लढवत आहेत. परमार यांच्या मुलाला शिवसेनेने रॅलीत उतरवल्याने त्याचा मतदारांवर कितपत परिणाम होईल, हे निकालानंतर समजले. अशा प्रकारच्या उमेदवारांना आपण मतदान करणार का, असा सवाल उपस्थित करून नीट विचार करूनच मतदान करा, असे आवाहन परमार यांच्या मुलाने प्रचारादरम्यान मतदारांना केले. (प्रतिनिधी)
प्रचार रॅलीत परमार यांचा मुलगाही
By admin | Published: February 20, 2017 5:50 AM