लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शहरातील आंबेडकर रोडवरील दोन दुकानांना गुरुवारी सायंकाळी लागलेल्या आगीत तेथील फळाच्या दुकानामधील पिंजऱ्यातील एका पोपटाचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. तसेच यामध्ये इंटरनेट आणि फळांच्या दुकानाचे नुकसान झाले असून त्या दुकानांच्या बाजूला असलेल्या भंगारातील दोन वाहनांनीही पेट घेतला आहे. तसेच ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने वर्तविला आहे.
या आगीत दुकानाशेजारी भंगारातील एक दुचाकी आणि एका टेम्पोनेही पेट घेतला. या आगीचा धूर लांबून दिसत होता. तसेच आगीने काही क्षणात भीषण रूप धारण केल्याने दुकानांचे नुकसान झाले. तसेच या आगीत फळांच्या दुकानातील पोपटाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष, राबोडी पोलीस आणि महावितरण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी दोन फायर इंजिन, एक रेस्क्यू वाहन आणि दोन पाण्याचे टँकर पाचारण केले होते.