ठाणे- घोडबंदर गावातील दत्त मंदिरा जवळील रस्त्याच्या कामादरम्यान सरकारी डोंगराचा काही भाग मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे कोसळला. यामुळे याठिकाणची काही बांधकामे धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे .
दरड कोसळून रस्त्यावर आल्याने काही वेळ एक बाजूचा रस्ता बंद झाला होता, महापालिकेच्यामार्फत रस्त्यावर पडलेला दरडीचा भाग बाजूला करण्यात आल्यानंतर रस्ता मोकळा झाला. या ठिकाणी पालिकेकडून बॅरिगेट्स लावण्यात आले असून सुरक्षा भिंत बांधण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. तर येथे नव्याने बेकायदा बांधकामे होत आहेत. या भागातील डोंगर हा बहुतांश वन हद्दीत असून डोंगर खचल्यास मोठी जीवित हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेसह संबंधित यंत्रणांनी पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.