ठाणे : माजीवडा गावातील सिद्धार्थ नगर येथील सुमारे ५० वर्षे जुनी असलेली तळ अधिक एक मजली साईकृपा चाळीच्या गॅलरीचा काही भाग पडल्याची घटना सोमवारी संध्याकाळी सहा ते सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली. तसेच त्या चाळीचा जिनाही धोकादायक स्थितीत असल्याचे पुढे आला असून त्या जिन्याच्या धोकादायक भाग तोडून बाजूला करण्यात आला. तसेच चाळीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश प्रभाग समिती मार्फत देण्यात आले आहेत. याशिवाय पहिल्या मजल्यावरील ०४ कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले असून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या पंधरावड्यातील चाळीचा सज्जा किंवा गॅलरीचा भाग पडण्याची ही चौथी घटना आहे.ठाणे महापालिका हद्दीतील समतानगर, खारटन आणि मुंब्र्यात चाळीचा सज्जा आणि गॅलरी पडल्याच्या घटना ताज्या असताना, सोमवारी माजीवडा गावात चाळीच्या गॅलरी काही भाग पडल्याची घटना समोर आली. ही चाळी ४५ ते ५० वर्षे जुनी असून ती रामानंद यादव यांच्या मालकीची आहे. या तळ अधिक एक मजली चाळीत १२ सदनिका आहेत. त्यामधील ७ सदनिका या तळ मजल्यावर तर ५ सदनिका या पहिल्या मजल्यावर आहेत. या चाळीत बहुतांश भाडेकरू असून काही सदनिकांमध्ये मालक राहत आहेत. तर काही सदनिका रिकाम्या आहेत.
सोमवारी या चाळीच्या गॅलरीचा अंदाजे १० ते १५ फूटाचा भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, माजिवडा प्रभाग समितीचे कार्यालयीन अधिक्षक, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.त्यावेळी त्या चाळीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असून सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून धोकापट्टी बांधण्यात आली आहे. तसेच तातडीने त्या चाळीतील पहिल्या मजल्यावरील सर्व रहिवाशांना तात्पुरत्या स्वरुपात दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत केल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.