कल्याण : कल्याण पश्चिमेतील आग्रा रोडलगत असलेल्या चंद्रव्हिला बदलापूर चाळ या इमारतीच्या जिन्याचा भाग बुधवारी रात्री कोसळला. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. ही इमारत अतिधोकादायक असून, महापालिकेने इमारतीला नोटीस बजावली होती. या इमारतीचे पाडकाम महापालिकेकडून हाती घेतले जाणार आहे.
तळ अधिक दोन मजले असलेल्या या इमारतीत १६ कुटुंबे राहत आहेत. बुधवारी इमारतीला महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली हाेती. लवकरच या अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम हाती घेतले जाणार असल्याचे प्रभाग अधिकाऱ्याने सांगितले. रात्री इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळला. इमारतीतील रहिवासी मोबदला मिळविण्यासाठी न्यायालयात गेले असून, पालिकेच्या कारवाईवर स्थगिती आदेश आणले असल्याची माहिती भाडेकरूंमार्फत देण्यात आली. इमारतीत गेली ५० वर्षे या भाडेकरूंचे वास्तव्य आहे. त्यांचे हक्क मिळावेत ही भाडेकरूंची मागणी आहे.
दरम्यान, महापालिकेने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई गेल्या महिनाभरापासून सुरू केलेली आहे. काही अतिधोकादायक इमारती पाडण्याचे काम पूर्ण केले आहे, तर काहींचे पाडकाम प्रगतिपथावर आहे.
फोटो-कल्याण-चंद्रव्हिला इमारत
--------------------------