बदलापूर - मनसे नेते अमित ठाकरेंचा सध्या राज्य दौरा सुरू आहे. शुक्रवारी ते बदलापूरमध्ये मनविसेच्या पुनर्बांधणी महासंपर्क बैठकांसाठी गेले असताना याठिकाणी चौथीत शिकणाऱ्या पार्थनं त्यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांच्या गर्दीत हॉल तुडूंब भरला होता. त्यात संकेत घुमरे दाम्पत्याने त्यांचा मुलगा पार्थ यांच्यासाठी अमित ठाकरेंकडे २ मिनिटांची भेट मागितली परंतु प्रत्यक्षात ही भेट २० मिनिटांची घडली.
घुमरे दाम्पत्यांनी अमित ठाकरेंना फक्त दोन मिनिटं भेटता येईल का? म्हणून विचारलं. पण प्रत्यक्षात २० मिनिटं त्यांची अमित ठाकरेंसोबत त्यांची 'ग्रेट भेट' झाली. त्याला कारणही तसंच होतं. इतर मुलांसारखा पार्थ हा सर्वसामान्य घरातील मुलगा पण कोरोना लॉकडाऊनच्या दिवसांत त्याला चित्रकला स्केचिंगची आवड युट्यूबमुळे निर्माण झाली. तो रोज स्केचिंगशी संबंधित व्हिडिओ बघून रेखाचित्र काढण्याचा सराव करायचा. बघता बघता त्याचा हात तयार झाला. कोणत्याही व्यक्तीचं हुबेहूब रेखाचित्र तो काढू लागला.
शुक्रवारी जेव्हा संकेत घुमरे आणि त्यांच्या पत्नीने अमित ठाकरेंना पार्थने काढलेली रेखाचित्रं दाखवली तेव्हा अमित आणि तिथे उपस्थित असलेले सर्वचजण थक्क झाले. अमित ठाकरेंनाही स्केचिंगची आवड असल्यामुळे आणि ते स्वतः एक उत्तम रेखाचित्रकार असल्यामुळे त्यांना छोट्या पार्थचं वेगळेपण समजलं. त्यांनी पार्थने काढलेल्या चित्रांच्या दोन्ही वह्या, त्यातलं प्रत्येक चित्र बघितलं. प्रत्येक चित्राबाबत पार्थला विचारलं आणि त्यांचं भरभरून कौतुक केलं. यावेळी"मला राजसाहेबांना भेटायचं आहे" अशी इच्छा पार्थने बोलून दाखवली, तेव्हा अमित ठाकरे म्हणाले, "नक्की. येताना तू काढलेली ही सगळी चित्रं सोबत घेऊन ये असं आमंत्रण त्याला दिले.
अमित ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सल्ला तुम्हाला राज ठाकरे यांचा मनसे पक्ष वाढवायचा असेल तर सर्वात आधी स्वत:चा अहंकार बाजूला ठेवा आणि कामाला लागा. पक्ष वाढवा, तसेच पूर्ण ताकदीने निवडणुका लढवा, असं अमित ठाकरे महासंपर्क अभियानात भिवंडीत पक्ष पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले. तसेच गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले आहेत. आता मात्र यापुढे आपल्याला फक्त विजय बघायचा आहे. आता राजकीय चढ-उतार नको, फक्त चढ हवा, असं अमित ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलं.