ठाणे - विद्या प्रसारक मंडळाच्या ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक चीन येथील विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार असून सोमवारी ते चीनसाठी रवाना होत आहेत. चीनमध्ये दरवर्षी ‘कॅस्टिक’ या नावाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यात शाळेचे आठ विद्यार्थी आणि दोन शिक्षक सहभागी होत आहेत.चीनमधील चाँगचिंग शहरात होत असलेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी येत्या सोमवारी चीनला जात आहेत. बेल्ट अॅण्ड रोड सायन्स इनोव्हेशन हे एक वेगळे प्रदर्शन असून या प्रदर्शनात गेल्या वर्षीपासून शाळेने सहभाग घेतला आहे. यंदा दोन शिक्षकांनीही प्रथमच या प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. कॅस्टिकमध्ये श्रिया ठाणेकर आणि दिव्या कद्रेकर या दोन विद्यार्थिनी वाहनातील प्रदूषण शोधणे आणि त्यावर नियंत्रण करणे, हा विज्ञान प्रकल्प सादर करणार आहेत. या प्रकल्पात या विद्यार्थिनींनी वाहनांमुळे होणारे प्रदूषण शोधून त्याची माहिती वाहनधारक आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यास पाठवण्यासंबंधातील माहिती सादर करणार आहेत. अनुराधा शेट्ये आणि सिद्धार्थ वेर्णेकर हे दोन विद्यार्थी आरबॉट अर्थात रक्षणकर्ता यंत्रमानव हा प्रकल्प सादर करणार आहेत. आरबॉट या यंत्रमानवामुळे जमिनीखाली अडकलेल्या अगदी सूक्ष्म जीवांचाही शोध घेता येऊ शकतो. आरबॉट अतिसूक्ष्म ज्ञानवाहकांनी सुसज्ज असून सजीवाच्या शरीरातून बाहेर पडणारे अतिसूक्ष्म किरणेही तो अंत:प्रेरणेने शोधू शकतो. यावर कॅमेरा असून बचाव पथकाला या ठिकाणची माहिती मिळू शकते. बेल्ट अॅण्ड रोड स्टुडंट सायन्समध्ये आयुष म्हात्रे, मोहित जोशी, ऋतुजा पाटणकर आणि मिहीर आगाशे यांच्याबरोबरच पौर्णिमा साठे आणि गौरी मोहिले या शिक्षिकाही सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना ठरावीक विषय देण्यात आले आहेत. शिक्षकांसाठी दोन हजार वर्षांपासूनच्या समुद्रसफारीवर प्रकल्प सादर करायचा आहे. या प्रदर्शनात सुधाकर आगरकर आणि विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय बेडेकरही जाणार आहेत.
ठाण्यातील विद्यार्थी चीनमधील विज्ञान प्रदर्शनात घेणार सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 3:38 AM