जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यातील पोलिस वसाहतींसह पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारात सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी रविवारी स्वच्छता अभियानात भाग ष्घेऊन श्रमदान केले. संपूर्ण आयुक्तालयाच्या क्षेत्रात अडीच हजारांहून अधिक पोलिसांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे स्वच्छता ही सेवा या श्रमदान उपक्रमात पोलिसांनीही उत्स्फूर्त सहभाग ष्घेतला. महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीनिमित्त मोदी यांनी देशवासियांसाठी स्वच्छता ही सेवा हे अनोखे अभियान जाहिर केले. त्यानिमित्ताने कोर्ट नाक्याजवळील ठाणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारात, मुख्यालय इमारतीचा परिसर, सिद्धी हॉल पोलिस वसाहत, अधिकारी निवाससन, जरीमरी पोलिस वसाहत, टॉवर पोलिस वसाहत परिसर (सूर्य, आदित्य, अरुण, भास्कर आणि रवी इमारत), चालक पोलिस वसाहत आणि जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील पोलिस वसाहत आदी परिसरात रविवारी सकाळी १० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय जाधव, गुन्हे अन्वेषण विभागाचे डॉ. पंजाब उगले, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. महेश पाटील तसेच मुख्यालयाचे उपायुक्त सुभाष बुरस, उपायुक्त राजेंद्र दाभाडे, सहायक आयुक्त शेखर डोंबे, ममता डिसूझा, राखीव पोलिस निरीक्षक राजेंद्र कत्तूल, पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्यासह २८० पोलिस कर्मचारी या मोहीमेत सहभागी झाले होते. याशिवाय, आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस उपायुक्त , सहायक आयुक्त कार्यालयासह पोलिस ठाण्याच्या आवारातही तब्बल अडीच हजार पोलिस कर्मचाºयांनी या स्वच्छता मोहीमेत आपला सक्रीय सहभाग नोंदवला.