- सदानंद नाईक
उल्हासनगर : राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व शहरात कलानी कुटुंबा शिवाय कायम ठेवणारे गटनेते भारत गंगोत्री यांच्या विरोधानंतरही पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी पंचम कलानी यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवड केली. निवडीला दिड महिन्याचा अवधी उलटल्यानंतरही पंचम कलानी यांनी जिल्हाकार्यकारणी घोषित न केल्याने, विविध चर्चेला ऊत आला असून यामागे गटनेते गंगोत्री यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीच्या वेळी, युवानेते ओमी कलानी यांनी समर्थकासह पक्षातून बाहेर पडून ओमी कलानी टीमची स्थापना केली. तसेच महापालिका सत्तेसाठी भाजप सोबत घरोबा करून कलानी समर्थकांनी भाजप चिन्हावर निवडणूक लढवून नगरसेवक पदी निवडून आले. मात्र भारत गंगोत्री गटामुळे राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक निवडून येऊन पक्षाचे अस्तित्व शहरात कायम ठेवले. तसेच गेली पाच वर्षे पक्षाचे बहुतांश कार्यक्रम व उपक्रम इमानेइतबारे राबविले.
दरम्यान ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पक्षाच्या संवाद यात्रे निमित्त शहरात आलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे यांनी यात्रेच्या दिवशी मध्यरात्री कलानी महल मध्ये भोजन निमित्त जाऊन कलानी कुटुंबासोबत बंद दाराआड चर्चा केली. दुसऱ्याच दिवशी गटनेते भारत गंगोत्री गटाचा विरोध डावलून पंचम कलानी यांचा समर्थकासह ठाणे येथे कार्यक्रमात पक्षप्रवेश करून शहरजिल्हाध्यक्ष पदाची माळ गळ्यात टाकली.
पंचम कलानी यांची राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड होऊन दिड महिन्याचा कालावधी लोटला. दरम्यानच्या काळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन वेळा शहरात येऊन गेले. तरीही पक्षाची जिल्हाकार्यकारणी जाहीर केली नसल्याने, विविध शंका-कुशंकेला शहरात ऊत आला. पक्षात भारत गंगोत्री गट नाराज असल्यानेच पंचम कलानी यांनी पक्षाची जिल्हाकार्यरणी जाहीर केले नसल्याची चर्चा रंगली आहे.
दिवंगत ज्योती कलानी ह्या यापूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्षा व आमदार पदी राहिल्या आहेत. तसेच महापालिकेवर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता असताना त्या महापौर व स्थायी समितीच्या सभापती पदी निवडून आल्या होत्या. मात्र गेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे युवानेते ओमी कलानी यांनी राष्ट्रवादी पक्षाचे बहुतांश नगरसेवक व पदाधिकारीसह पक्षातून बाहेर पडत स्थानिक ओमी कलानी टीमची स्थापना केली.
व्हर्क्युयल रॅलीला गंगोत्री गटाची दांडी-
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या जन्मदिवसा निमित्त सपना गार्डन सेलिब्रेशन हॉल मध्ये पक्षाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा पंचम कलानी यांनी व्हर्क्युयल रॅलीचे आयोजन केले होते. मात्र रॅलीला गंगोत्री समर्थकांनी दांडी मारल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.