उमेश जाधव, टिटवाळाकडोंमपाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. याकरिता १४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. सर्वपक्षीयांसह अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु, पक्षाच्या नेत्यांनी चर्चेत असणाऱ्या उमेदवारांना एबी फार्म न देता ते नव्या उमेदवाराला दिल्याने पितृपक्षापेक्षा स्वत:चाच पक्ष त्यांना अपशकुनी ठरला आहे.निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यापासून कामाला लागलेले कडोंमपातील सगळ्याच पक्षांतील निष्ठावंत व चर्चेतील इच्छुकांना याचा अनुभव आला. विशेषत: मांडा-टिटवाळ्यातील सर्वच पक्षांतील बहुसंख्य उमेदवारांना याचा अनुभव आला आहे.येथील प्रभाग क्रमांक ८ मधून आरपीआय व भाजपा युतीच्या उमेदवार उषा भोईर येथील पहिल्या उमेदवार घोषित करण्यात आल्या होत्या. त्यांनी तर आपल्या प्रचाराच्या कार्यालयाचे उद्घाटनदेखील भाजपा व आरपीआय वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते केले होते. परंतु, अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मात्र युती न झाल्याने त्यांना फक्त आरपीआयच्या बॅनरखाली अर्ज दाखल करावा लागला. तसेच शिवसेनेने आमंत्रण देऊन बोलवलेल्या याच प्रभागातील उमेदवार अनसूया वाळंज यांना तर अर्ज भरण्यासाठी पक्षाच्या शहर कार्यालयात बोलवून एबी फार्म मात्र दुसऱ्याच इच्छुकाला दिला. याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ९ मध्येदेखील तेच झाले. येथे शिवसेनेचे चार इच्छुक रिंगणात होते. पण, यात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे प्रवीण भोईर. त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते की, नाव कट होईल म्हणून, परंतु रात्रीच सूत्रे हलली आणि त्यांचे नाव कट करून त्याजागी दुसरे इच्छुक अनिल महाजन यांची वर्णी लागून पक्षाचा एबी फार्म त्यांना मिळाला. यामुळे गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेले भोईर नाराज झाले आहेत. त्यांना तिकीट नाकारल्याचे कारणदेखील वेगळेच आहे. ते हे की, या प्रभागात गाववाले व भोईर नावाची दहशत आहे. म्हणून तिकीट नाकारले, अशा चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीत विजय देशेकर यांची उमेदवारी १०० टक्के फायनल मानली जात होती. परंतु, काही क्षणातच चित्र बदलले आणि येथील राष्ट्रवादी नेत्यांनी नवीन चेहरा सुरज पाटील यांना उमेदवारी दिली.
पक्षच ठरला अपशकुनी
By admin | Published: October 15, 2015 1:38 AM