ठाणे : डोंबिवली लोकलमधील महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्ब्यात सेंकड क्लासचे प्रवासी बसत असल्याच्या एका ट्विटने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालय आणि तिकिट निरीक्षकांची धावपळ उडाली. याचदरम्यान,ठाणे रेल्वे स्थानकात त्या लोकलसह अन्य दोन अशा तीन लोकलमधून ठाण्यात उतरलेल्या प्रवाशांची तिकीट तपासणी केली असता प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून प्रवास करणा-या आणि सेंकड क्लासचे तिकिट असणा-या ९ ते १० जणांना पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे रेल्वे स्थानकातून रात्री जाणारी ८.५५ ची धीम्या मार्गावरील डोंबिवली लोकलमधील महिला प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून एका महिलेने सेंकड क्लासमधील काही प्रवासी चढल्याची तक्रार रेल्वे ट्विट सेलवर केली. त्या तक्रारीनुसार,ट्विट सेलने ती माहिती ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाला देऊन कारवाई करण्याबाबत सुचना केल्या. त्यानुसार, चार तिकिट निरीक्षक आणि चार रेल्वे सुरक्षा बलाचे जवान रेल्वे स्थानकात तातडीने तैनात केले. रात्रीच्या ८.५५ वाच्या डोंबिवली लोकलसह अन्य दोन गाड्यांमधील प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून ठाण्यात उतरलेल्या प्रवाशांच्या तिकिटाची तपासणी केली. त्यावेळी ९ ते १० जणांना पकडल्याची माहिती ठाणे प्रबंधक कार्यालयाने दिली. दरम्यान, यावेळी प्रवासी आणि तिकिट निरीक्षकांमध्ये खटकेही उडले. त्यावेळी सुटण्यासाठी काहींनी चुकून डब्ब्यात चढल्याचे कारण दिले. तरीसुद्धा निरीक्षकांनी त्यांचे काही न ऐकता, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.