बदलापूर : लोकल आणि फलाट यांच्यातील वाढलेले अंतर कमी करण्याचे काम बदलापूरमध्ये सध्या सुरू आहे. मात्र, हे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. पहाटे ६ पासून बदलापूर रेल्वेस्थानकात चाकरमान्यांची गर्दी होणार हे माहीत असतानाही फलाटाची उंची वाढवण्यासाठी रात्री उशिरा काँक्रिट टाकण्यात आले. सकाळी अचानक फलाटावर गर्दी झाल्यावर सर्व प्रवाशांचे पाय या काँक्रिटच्या चिखलात रुतले. सिमेंटने बरबटलेले पाय घेऊनच प्रवाशांना लोकलमध्ये चढावे लागले.
बदलापूर रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-१ आणि २ हे एकत्रित आहे. या फलाटांची उंची वाढवण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. मात्र, हे काम करणाºया कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा प्रवाशांना त्रासदायक ठरला आहे. रात्री उशिरा फलाटावर काँक्रिट टाकण्यात आले. थंडीत हे काँक्रिट पाच ते सहा तासांत सुकणार नाही, याची कल्पना असतानाही कंत्राटदाराने हे काँक्रिट टाकण्याचे काम केले.मात्र, रात्री उशिरा हे काम झाल्याने लागलीच तासदोन तासांत प्रवाशांची गर्दी फलाटावर व्हायला सुरुवात झाली. कंत्राटदाराने काम न थांबवता सर्वत्र काँक्रिट टाकले होते. अनेक प्रवाशांना हे काँक्रिट ओले असल्याची कल्पनाच नव्हती. ते नेहमीप्रमाणे लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावल्यावर त्यांचे पाय या काँक्रिटमध्ये रुतले.
अनेकांचे पाय, चप्पल, बूट आणि कपडेही खराब झाले. स्टेशनवर टाकलेले काँक्रिट हे ओले असल्याने या काँक्रिटवर प्रवाशांचे पाय रुतल्याने केलेले काम वाया गेले आहे. कंत्राटदाराच्या या बेजबाबदारपणाबाबत रेल्वेच्या अधिकाºयांनीही त्याची कानउघाडणी केली आहे. काँक्रिट टाकताना पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने हा प्रकार घडल्याचे कंत्राटदाराने कबूल केले आहे. मात्र, कंत्राटदाराच्या या चुकीमुळे शेकडो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. सकाळी फलाटावर आलेल्या प्रवाशांना लोकल पकडताना कसरत करावी लागत होती.