डोंबिवली : कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवलीपाठोपाठ आता कोपर रेल्वेस्थानकाला पश्चिम दिशेकडे होम प्लॅटफॉर्मची सुविधा रेल्वे प्रशासनाने दिली असून त्याचे विद्युतीकरण काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, प्रशासनाकडून अधिकृत शुभारंभाची वाट न बघता प्रवाशांनी त्याचा वापर सुरू केला आहे. होम प्लॅटफॉर्मची सुविधा मिळाल्याने प्रवासी काही प्रमाणात समाधानी आहेत.
कोपर रेल्वेस्टेशनला पश्चिमेला होम प्लॅटफॉर्म तयार केला असून याचा उपयोग आता कोपर पश्चिम आणि अप्पर कोपरमधील प्रवाशांनी सुरू केला आहे. त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली आणि कोपर आता या चारही स्टेशनला होम प्लॅटफॉर्मची सुविधा मिळाली आहे.
मध्य रेल्वेमार्गावरील दिवा आणि डोंबिवली स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या कोपर रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. कोविडआधी येथून दररोज सुमारे ५० हजार प्रवासी प्रवास करत होते. आताही हजारो प्रवासी येजा करत असून या स्थानकातून सुमारे अडीच लाख रुपयांची तिकीट, पासच्या माध्यमातून उलाढाल सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी कमी झाले असले, तरी भविष्यात हे प्रवासी वाढणार आहेत. तसेच दिवा-वसई मार्गावरील अप्पर कोपर हे महत्त्वाचे स्थानक असून या स्थानकावरून पनवेलपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. कोपर स्थानकावर एकमेव पादचारी पूल असून गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. विशेषतः दिवा-वसई गाडीच्या वेळेत पुलावरून प्रवास करणे कठीण होते. ही गर्दी लक्षात घेता खासदार शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पुलाची रुंदी वाढविण्यात यावी. शिवाय, कोपर स्थानकात होम प्लॅटफॉर्म व मुंबई दिशेला पादचारी पुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याचा उपयोग आता कोपर पश्चिम आणि अप्पर कोपरमधील प्रवाशांना होत असून पश्चिमेला राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
----///-----------